टक्का वाढला

टक्का वाढला

टक्का वाढला, धक्का कोणाला
निकालाबाबत उत्सुकता, लागल्या पैजा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मतदान झाले. मतांचा वाढलेला हा टक्का कुणाला धक्का देणार याविषयी उत्सुकता आहे. निकालावरून दोन्ही गटांचे कार्यकर्ते व नेत्यांता गावागावांत पैजा लागल्या असून, मंगळवारी (ता. २५) काय होणार? याविषयी गावनिहाय झालेल्या मतदानावरून आकडेमोड करण्यात दोन्ही गटाचे कार्यकर्ते व्यस्त होते.
‘राजाराम’ ची यापूर्वीची निवडणूक २०१५ मध्ये झाली. त्यावेळीही काटाजोड झालेल्या लढतीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्यासोबत असलेले ‘जनसुराज्य चे आमदार डॉ. विनय कोरे हे यावेळी सत्ताधाऱ्यांसोबत आहेत. त्यांच्या या भूमिकेचा कोणाला फायदा झाला याचीही फैसला मंगळवारी होईल.
२०१५च्या निवडणुकीत कारखाना कार्यक्षेत्रातील १२२ गावांतील ५६ केंद्रांवर हे मतदान झाले होते. त्यावेळी कारखान्याच्या एकूण १२ हजार ६२४ सभासदांपैकी ११ हजार ३९५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची ही टक्केवारी ९०.२६ होती. यावेळी कारखान्याचे उत्पादक गटातील १३ हजार ४०९ तर संस्‍था गटातील १२९ अशा १३ हजार ५३८ सभासदांपैकी १२ हजार ३३६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतांची ही टक्केवारी ९१.१२ टक्के आहे. वाढलेल्या एक टक्के मताचा धक्का कोणाला बसणार हे मंगळवारी स्पष्ट होईल.
कारखाना कार्यस्थळ असलेल्या कसबा बावड्यात गेल्या निवडणुकीत १०४४ सभासद होते. यापैकी ९५६ सभासदांचे मतदान झाले. ही टक्केवारी ९१.५७ टक्के होती. यावेळी बावड्यात ९७४ मतदान होते, यापैकी ९१९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. ही टक्केवारी ९४ टक्के होते. गेल्या निवडणुकीत कसबा बावडा येथून आमदार सतेज पाटील यांचे उमेदवार कै. विश्‍वास नेजदार यांना ६०८ तर विद्यानंद जामदार यांना ५९२ मते मिळाली. बावड्यात महाडिक गटाचे उमेदवार दिलीप उलपे यांना २९६ व हरिश चौगले यांना २७० मते मिळाली होती. गेल्या निवडणुकीत ताकदीने पाटील यांच्या मागे राहिलेला बावडा यावेळी कोणाच्या बाजूने जाणार याविषयीही उत्सुकता आहे.

चौकट
संस्था गटात तेवढेच मतदान
गेल्या निवडणुकीत संस्था गटात १२९ मतदान होते, यावेळीही तेवढेच राहिले. गेल्या निवडणुकीत या गटात शंभर टक्के मतदान झाले होते, त्यापैकी महाडिकांना ९२ तर विरोधी आघाडीचे उमेदवार सखाराम चव्हाण यांना ३४ मते मिळाली होती. यावेळी या गटात १२९ पैकी १२८ सभासदांचे मतदान झाले.
-
आकडेमोड सुरू
सायंकाळी मतदान संपल्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरू झाली आहे. गावनिहाय झालेले मतदान, त्या गावातील आपली जोडणी, कार्यकर्त्यांकडून मागोव घेत हा ठोकताळा बांधला जात होता. त्यासाठी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या नेत्यांच्या कार्यालयात गर्दी केली होती. रात्री उशीरापर्यंत ही गर्दी कायम होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com