
पीटीएम अ उपांत्य फेरीत
लोगो - ‘इंगवले सर’ फुटबॉल स्पर्धा
98144
कोल्हापूर : झुंझार क्लबतर्फे आयोजित इंगवले सर चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील विरुद्ध दिलबहार सामन्यातील एक क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
पीटीएम ‘अ’ उपांत्य फेरीत
सामना चुरशीने; ‘दिलबहार’वर २ विरुद्ध १ गोल फरकाने विजय
कोल्हापूर, ता. २३ : झुंजार क्लब आयोजित ‘इंगवले सर’ चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ - अ संघाने दिलबहार तालीम मंडळ संघावर २ विरुद्ध १ गोल फरकाने मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरु आहे. पीटीएम अ विरुद्ध दिलबहार तालीम यांच्यातील सामना चुरशीचा झाला.
पीटीएम संघाच्या सोमाडी याने पहिल्याच मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात १ - ० अशी आघाडी घेतली. आक्रमक सुरुवात करत पीटीएम ‘अ’ने दिलबहार तालीम संघावर दबाव निर्माण केला. थोड्याच वेळात चौथ्या मिनिटाला कैलास पाटीलच्या कॉर्नर किक पासवर ऋषिकेश मेथे-पाटील याने हेडद्वारे गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर दिलबहार संघाकडून गोल नोंदवण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र यश आले नाही.
उत्तरार्धात दिलबहार तालीम संघाने अधिक आक्रमक चाली रचल्या. शॉर्ट पासिंगवर भर देत पीटीएम ‘अ’ संघाच्यामध्य फळी व बचावफळीला झुंजवले. दरम्यान, गोलजाळीवर केलेले आक्रमण पीटीएमचा गोल रक्षक यश एरंडोले याने थोपवले. सामन्याच्या ६३ व्या मिनिटाला दिलबहार संघाच्या व्हेलेटाईन याने गोले नोंदवत गोलफरक २ - १ असा केला. यानंतर दिलबहार तालीमच्या खेळाडूंनी अधिक आक्रमक खेळ केला. मात्र गोल नोंदवणे शक्य झाले नाही. पीटीएम ‘अ’च्या खेळाडूंकडून गोल नोंदवण्याचे झालेले प्रयत्न दिलबहारचा गोल रक्षक शुभम घराळे याने फोल ठरवले. अखेर सामना पीटीएम ‘अ’ संघाने २ - १ असा जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
--------------
सामनावीर
ऋषिकेश मेथे - पाटील पीटीएम ‘अ’
लढवय्या
व्हेलेंटाईन - दिलबहार
आजचा सामना
संध्याकाळी ४ वाजता प्रॅक्टिस क्लब विरुद्ध बालगोपाल तालीम