संस्था गट

संस्था गट

संस्था गटात महाडिकांचे मताधिक्य घटले
तरीही विजयाचा गुलाल ः उलटसुलट चर्चेला निकालाने पूर्णविराम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकीय पटलाचे सर्वाधिक लक्ष लागलेल्या संस्था गटात कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला असला तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांचे मताधिक्य मात्र घटले.
या गटातील निवडणूक अतिशय चुरशीची होईल, असे वातावरण विरोधकांकडून तयार केले होते; पण महाडिक यांचे मताधिक्य जरी घटले असले तरी त्यांनी दणदणीत विजय मिळवून मतदानानंतर सुरू झालेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम दिला.
या गटात गेल्या अनेक वर्षांपासून १२९ एवढेच सभासद आहेत. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत या गटातून महाडिक यांनी ९२ तर विरोधी पॅनेलचे उमेदवार सखाराम चव्हाण यांना ३४ मते मिळाली होती. यावर्षी तेवढेच मतदार होते. पण, मतदान १२८ सभासदांनी केले. पहिल्यापासूनच या गटात महाडिक यांनाच रोखून शह देण्याची रणनीती विरोधी गटाने आखली होती. त्यानुसार प्रत्येक मतदाराच्या संपर्कात विरोधी गटाचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांच्यासह त्यांचे पुतणे आमदार ऋतुराज, बंधू डॉ. संजय डी. पाटील संपर्कात होते. काहीही करून याच गटात महाडिक यांना रोखण्याचा प्रयत्न अनेक मार्गांनी झाला. त्यात सत्तारूढ गटाची काही मते आपल्याकडे वळवण्यात पाटील यांना यश आले; पण ही जागा खेचून आणण्यात मात्र त्यांना अपयश आले.
यावेळी या गटात १२८ सभासदांनी मतदान केले. त्यापैकी महाडिक यांना ८३ तर विरोधी गटाचे उमेदवार सचिन पाटील यांना ४३ मते मिळाली. एक मत बाद झाले. या गटात महाडिक यांच्यासारखा तगडा उमेदवार असूनही पाटील यांनी चांगली मते घेतली, त्याचे श्रेय अर्थातच सतेज पाटील यांना जाते. मतदान झाल्यापासून या गटात महाडिक यांना धक्का बसेल, अशी अटकळ विरोधकांची होती, प्रत्यक्षात महाडिक यांनीच विरोधकांना धोबीपछाड देत विजय मिळवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com