
आजऱ्यात रविवारी रास्ता रोको
आजऱ्यात रविवारी रास्ता रोको
गिरणी कामगारांच्या बैठकीत इशारा; सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन
आजरा, ता. २५ ः गिरणी कामगार रविवारी (ता. ३०) रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. कामगारांना हक्काचे घर मिळाले पाहीजे यासाठी सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
रविवारी दुपारी १२ वाजता बाजार मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते संभाजी चौकापर्यंत मोर्चाने येवून येथे रस्ता रोको केला जाणार असल्याचा इशारा गिरणी कामगारांच्या बैठकीत दिला. सर्व श्रमिक संघटनेच्याच्या कार्यालयात बैठक झाली. गिरणी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष शांताराम पाटील अध्यक्षस्थानी होते. काही गिरणी कामगार संघटना सरकार धार्जिण असल्याचा आरोप करत त्यांचा निषेध केला.
पाटील म्हणाले, ‘मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा रेंगाळलेला प्रश्न मुख्यमंत्री यांनी सोडवलेला नाही. त्यांनी १८ जानेवारीला आश्वासन दिले होते. त्यानंतर ९ मार्चला मुख्यमंत्री यांचे ठाणे येथील घरावर मोर्चाचे आयोजन केल्यानंतर सर्व श्रमिक संघटनांसमवेत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे मान्य केले. परंतू अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. आमदार प्रकाश आबिटकर यांनी अधिवेशनात ५८ मिलची एनटीसीसह माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनात आश्वासन देवून, त्यांनी नेमलेल्या समितीकडूनही हालचाल झाली नाही. काही शासन धार्जीण संघटनांच्यावतीने एमएमआरडीच्या घरांची मागणी करून गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर काढण्याचा डाव केला जात आहे. तो हाणून पाडला जाईल.’
गोपाळ गावडे यांनी आंदोलनाला हजारोंच्या संख्येने गिरणी कामगार व वारसदार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले. नारायण राणे, गणपती ढोणुक्ष, विजय पाटील, मानापा बोलके, धोडिबा कांबळे, जानबा धडाम, दौलती राणे, हिंदूराव कांबळे आदी उपस्थित होते. निवृत्ती मिसाळ यांनी आभार मानले.
-----
मुंबई येथे कापड उद्योगातील एक चतुर्थांश जागा गिरणी कामगारांना देण्याचे मान्य केले आहे. यासाठी मुंबईत घरे देवून पुनर्वसन झाले पाहीजे याची आठवण करण्यासाठी हे आंदोलन होत आहे.
-नारायण भंडागे