जिल्ह्याचे राजकारण

जिल्ह्याचे राजकारण

आता संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांत
‘राजाराम’मुळे महाडिकांना बळ ः विधान परिषद निवडणूक राहणार ‘टार्गेट’

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महादेवराव महाडिक हा संघर्ष आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत पहायला मिळणार आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष असला, तरी महाडिक गटाचे पुढचे ‘टार्गेट’ विधान परिषद असेल, त्यासाठीचा संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल.
माजी आमदार महादेवराव महाडिक १९९७ मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवर विजयी झाले. त्यानंतर सलग १८ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्था गटातून आमदार होते. महाडिक यांची विधान परिषदेवर निवड झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने त्यांचे नेतृत्व पुढे आले. या जोरावरच त्यांनी ‘गोकुळ’, जिल्हा बँक, बाजार समिती आणि अन्य जिल्हा पातळीवरील संस्थांत आपले बस्थान बसवले. एकेकाळी अशी परिस्थिती होती की या जिल्ह्यात अपवाद सोडला, तर महाडिक यांची मदत न घेतलेला राजकीय नेता कोल्हापुरात नाही. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात त्यांची ताकद आहे. या जोरावर ते कोणाला विजयी करू शकतील का नाही हे माहीत नाही; पण पराभव मात्र करू शकतात. त्यामुळेच बहुतांशी राजकीय नेत्यांनी त्यांची मदत घेतली आहे.
‘राजाराम’मध्ये महाडिक विरुद्ध सतेज पाटील हा टोकाचा संघर्ष जिल्ह्याने पाहिला. त्यात महाडिक यांनी बाजी मारली असली तरी त्यांच्यापुढेही भविष्यात मोठी आव्हाने आहेत. विधान परिषदेसाठी कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेसह अन्य सर्वच नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे महत्त्वा‍चे आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना राहील. भाजप म्हणजे महाडिक आणि महाडिक म्हणजे भाजप अशी आजची स्थिती आहे. त्यात आमदार डॉ. विनय कोरे, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सद्यस्थितीत राज्याच्या राजकारणात भाजपसोबत आहेत; पण त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेची निवडणूक २०२७ मध्ये आहे. तोपर्यंत जिल्ह्याचे आणि राज्याचेही राजकारण काय असेल, यावर ही सर्व गणिते अवलंबून आहेत.

चौकट
विधानसभा, लोकसभा महत्त्वाची
पुढच्या विधान परिषदेपूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुका आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार सतेज पाटील यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी असेल. गेल्या विधानसभेत त्यांनी भाजपचे संख्याबळ शून्य करतानाच जिल्ह्याच काँग्रेसचे विधानसभेचे चार आणि विधान परिषदेत स्वतःसह दोन आमदार निवडून आणले. पुढील वर्षी होणाऱ्या या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपकडून शौमिका महाडिक यांना रिंगणात उतरवून याच मतदारसंघात पाटील यांना अडकवून ठेवण्याचा प्रयत्न महाडिकांचा असेल. त्याला पाटील प्रत्युत्तर कसे देतात, हे महत्त्वाचे आहे; पण तत्पूर्वी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाबरोबरच पाटील यांच्यादृष्टीने अग्निपरीक्षा असतील.
..........

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com