राजकीय फडात बळी खेळाडूंचा

राजकीय फडात बळी खेळाडूंचा

राजकीय फडात बळी खेळाडूंचा

कुस्ती प्रमाणपत्र पडताळणीचा घोळ कायम 

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. २६ : कुस्तीच्या आखाड्यात राजकीय फड रंगल्याने कुस्तीपटूंचे भवितव्य टांगणीला लागले आहे. पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धांची प्रमाणपत्रे अजून पडताळणी झाली नसतानाच महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धांचा संभ्रम निर्माण झाला. एकीकडे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने मान्यता दिलेली नाही. दुसरीकडे परिषदच बरखास्त असून, ते निर्णय घेणारे कोण? असा प्रतिसवाल कोल्हापुरातील स्पर्धा आयोजकांनी केला आहे? आखाड्यातल्या श्रेयवादी राजकीय कुस्तीचा दूरगामी परिणाम खेळाडूंच्या भवितव्यावर होण्याची परिस्थिती यामुळे निर्माण झाली.
जानेवारीत (स्व.) मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा झाल्या. मात्र, या ठिकाणी विजेत्यांना दिलेली प्रमाणपत्रे वैध होत नसल्याने या खेळाडूंच्या हातात असणारी प्रमाणपत्रे सध्या तरी केवळ छापील कागद ठरत आहे. महिनाभरापूर्वी सांगली येथे महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. याला मात्र महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मान्यता होती. मात्र, सध्या कोल्हापूरमध्ये सुरू असणारी महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा हीच अधिकृत पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा असल्याचा दावा आयोजकांचा आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने काढलेले पत्रक, अनुभवाचा अभाव व ढिसाळ नियोजनामुळे या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे. मात्र, स्पर्धा संपल्यावर मिळणारी प्रमाणपत्रे पडताळणी करून घेण्यासाठी खेळाडूंना पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार, हे निश्चित. 

कोट 
परिषदेची मान्यता नसताना होणाऱ्या स्पर्धा या अधिकृत असू शकत नाहीत. यामुळे अनेकांनी केलेले सर्व दावे खोटे आहेत. असे असले तरीही महिला खेळाडूंना निर्माण झालेले व्यासपीठ व मोठ्या स्पर्धेत सहभागी होताना आवश्यक असणारी मानसिकता निर्माण होण्यासाठी फक्त कोल्हापूर व सांगलीतील काही महिला खेळाडू सहभागी झाल्या आहेत. खासबागसारखे ऐतिहासिक मैदान कुस्तीसाठी आहे. या ठिकाणी होणारे राजकारण कदापि मान्य होणार नाही. मात्र, कुस्ती रोखणेही योग्य नाही. स्पर्धा होऊ दे, खेळाडूंना व्यासपीठ मिळू दे, इतकाच प्रयत्न राहील.
- व्ही. बी. पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ

कोट 
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणारी स्पर्धा अधिकृत असल्याने सांगलीतील स्पर्धा अधिकृत मानावी लागेल. मुळातच ट्रस्टमार्फत होणाऱ्या स्पर्धा व त्यातून खेळाडूंना मिळणारे किताब यांना मर्यादा आहेत. असे असताना खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून स्पर्धा योग्य आहेत. मात्र, होणारे दावे चुकीचे असू शकतात.   
- ॲड. महादेवराव अडगुळे, सरचिटणीस, कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ 

कोट 
वाद पुण्याचा, राज्य वेठीला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व पुणे तालीम संघ असा वाद सुरू असल्याने राज्यातील ३६ जिल्ह्यांतील कुस्ती मात्र वेठीस धरली गेली आहे. न्यायालयीन निकालानंतर कोण अधिकृत, कोण अनधिकृत हे ठरेल. मात्र, तोपर्यंत खेळाडूंच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? कुस्तीसाठी झटणाऱ्या संघटनांनी कुस्तीच्या भवितव्याचा विचार करण्याची हीच वेळ आहे.  
- अशोक पोवार, सचिव, कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ

कोट
पुण्यातील पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसह कोल्हापुरातील कुस्ती स्पर्धा अधिकृतच आहे. ज्या खेळाडूंचे प्रमाणपत्र पडताळणी होत नसेल, तर त्यांनी ती आमच्याकडे आणावीत, आम्ही ती पडताळणी करून देऊ.
- दीपाली सय्यद, कुस्ती स्पर्धा आयोजक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com