
यिन अधिवेशन
98823
नवी दिल्ली ः यिन अधिवेशनात बोलताना खासदार धनंजय महाडिक, शेजारी कृष्णराज महाडिक.
मनगटात ताकद असेल तोच राज्य करेल
खासदार महाडिक यांचे मत; यिन अधिवेशनाचा समारोप
नवी दिल्ली, ता. २६ : ‘पुढाऱ्याचा पोरगा पुढारीच होईल, असं तुम्ही मानू नका. समाज बदलत असून, इथून पुढे हे चालणार नाही. ज्याच्या मनगटात ताकद असेल, तोच राज्य करेल,’ असे मत व्यक्त करत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘यिन’ सदस्यांना बुधवारी सल्ला दिला.
सकाळ माध्यम समूह आयोजित यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) केंद्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात ते बोलत होते. यावेळी खेळाडू, यूट्यूबर आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत कृष्णराज महाडिक उपस्थित होते. राजकीय प्रवास उलगडत असताना धनंजय महाडिक यांनी ‘यिन’च्या सदस्यांना काही कानमंत्र दिले. चांगल्या लोकांची गरज समाजाला आहे. आजपासूनच सामाजिक काम सुरू करा. छोट्या छोट्या गोष्टीतून होणारा बदल तुम्हाला संधी देईल आणि याच संधीतून तुमचे नेतृत्व विकसित होईल. कुस्ती खेळताना एका मैदानात हार झाली, तरी पुढच्या मैदानात समोरच्याच्या छातीवर बसण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे खेळत राहा, असा सल्लाही त्यांनी दिला.
एक खेळाडू ते उद्योगपती व्हाया यूट्यूबर हा प्रवास उलगडताना कृष्णराज म्हणाले, ‘पहिलवानकीची परंपरा असलेल्या घराण्यात मी मात्र वेगळा खेळ निवडला. ‘फॉर्म्युला रेसिंग थ्री’मध्ये मी राष्ट्रीय विजेता आहे. कोरोना काळात यूट्यूबर म्हणून उदयास आलो. आजूबाजूच्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणे हेच खरी समाजकार्य आहे. मी माझ्या यूट्यूबच्या उत्पन्नाचा वापर यासाठी करत आहे.’ समाज माध्यमांचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीबरोबरच व्यवसायासाठी करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, यिन अधिवेशनाचा समारोप माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना, ‘संसद हे लोकशाहीचे मंदिर आहे. जिथे तुमच्या मताची आणि विचारांची पूजा केली जाते. लोकप्रतिनिधी बनण्यासाठी राजकारणात सेवा भाव महत्त्वाचा असून, राजकारण हा कोणाचा वारसा हक्क नाही,’ असे त्यांनी व्यक्त केले.
‘यिन’ सदस्यांना राजकारणात आवश्यक आचरणाबद्दल अहीर यांनी मार्गदर्शन केले. ‘पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञानही महत्त्वाचे आहे. चांगली संगत, चांगले मित्र निवडले तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आपण ज्या राज्यातून येतो, तो महाराष्ट्र सहकार आणि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे संतांचा सेवाभाव मनात ठेवून राजकारणात उतरा. आपल्या पदाची आणि व्यवसायाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. केवळ राजकीय पक्षाच्या भरवशावर न राहता कर्तृत्वाच्या जोरावर निवडणूक जिंका,’ असा सल्ला त्यांनी दिला.
‘यिन’च्या चार समित्यांच्या सदस्यांना यावेळी अहीर यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ‘सकाळ’चे दिल्लीचे ब्युरो चीफ विकास झाडे उपस्थित होते.
धनंजय महाडिक म्हणाले...
महाविद्यालयीन जीवन ही राजकारणाची पहिली पायरी
संधी फार मिळत नाही, मिळाली तर ती सोडू नका
वाचन, अध्ययन, आचार, विचार आणि आहारात शॉर्टकट नाही
आयुष्यात शिक्षण, ज्ञान आणि आरोग्य सांभाळा
सरकारी योजना गरिबांपर्यंत पोहोचवा.
हंसराज अहिर याचा सल्ला
वारसा हक्काने किंवा जातीच्या आधारावर आता राजकारण करता येणार नाही,
ज्यांना राजकारणात यायचे आहे, त्यांनी समाजसेवा करावी
सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवा. त्याचबरोबर स्वतःही स्वावलंबी व्हा
कामात जिद्द, एकाग्रता आणि सातत्य असले पाहिजे.