रंकाळा पाहणी

रंकाळा पाहणी

99010
कोल्हापूर : रंकाळा पाहणीदरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने आदी.

रंकाळ्याच्या मास्टर प्लॅनमध्ये
कोल्हापूरचे प्रतिबिंब हवे
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे; परिसरातील कामांची केली पाहणी
कोल्हापूर, ता. २७ : ‘‘रंकाळा तलावाभोवतीने फिरताना तिथे पर्यटकाला कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब दिसले पाहिजे, अशा प्रकारे हेरिटेजच्या दृष्टीकोणातून परिसराचा विकास करावा. खुल्या संग्रहालयासारखी संकल्पना राबवली जावी. त्यासाठी स्पर्धेतून सल्लागार नेमून त्याच्याकडून मास्टर प्लॅन बनवून घ्या,’’ अशा सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. दोनशे कोटींचा आराखडा झाला तरी चालेल असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर दुपारी रंकाळा परिसराची पाहणी केली. तेथील सुरू असलेल्या कामांची तसेच मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर संगीत कारंजा बसवण्याच्या कामाची माहिती घेऊन काही सूचनाही केल्या. या वेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, ऋतुराज क्षीरसागर, उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजित घाटगे, महापालिकेचे अधिकारी, आर्किटेक्ट उपस्थित होते. पाहणीवेळी शिंदे यांनी रंकाळ्यावरील भेलचा आस्वादही घेतला.
खासदार शिंदे महापालिका प्रशासनाला सूचना देताना म्हणाले, ‘‘रंकाळा तलावाचे पुनरूज्जीवन, संवर्धन तसेच सुशोभीकरण आवश्‍यक आहे. तलावाचा हेरिटेज लूक जपतच नवीन कामे प्रस्तावित करा. पदपथाची रुंदी वाढवा. त्यासाठी चिरा, बेसाल्ट वापरा. पर्यटकाला येथे फिरताना कोल्हापूरची कुस्ती, ऐतिहासिक परंपरा, फुटबॉल, दूध कट्टा अशा विविध वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब दिसले पाहिजे. त्यासाठी क्युआर कोड वा साऊंड सिस्टिमसारख्या तंत्रज्ञानाचा आधार घ्या. खुल्या संग्रहालयासारखी संकल्पना अंमलात आणता येऊ शकते. त्याकरिता साऱ्या परिसराचा मास्टर प्लॅन बनवण्याची आवश्‍यकता असून स्पर्धा घेऊन सल्लागार नेमला जावा. त्यांच्याकडून कितीही रकमेचा आराखडा तयार झाला तरी चालेल, त्याची पुढील तीन-चार वर्षात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करता येऊ शकते. तो प्रस्ताव सरकारला सादर करा.’’ या वेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कामे गतीने करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
प्रशासक डॉ. बलकवडे यांनी प्रारंभी रंकाळा विकासाच्या कामाची माहिती दिली. अमृत दोन योजनेतून पाणी स्वच्छता, संवर्धनाची कामे प्रस्तावित केली आहेत. त्यासाठी निधीही मिळाला असल्याचे सांगितले. सध्या सुरू असलेल्या कामांची आर्किटेक्टच्या प्रतिनिधींनीही माहिती दिली.
-------------
चौकट
कोल्हापूरच्या पर्यटनासाठी मंत्रालयात बैठक व्हावी
कोल्हापूरमध्ये पर्यटनासाठीची खूप गुणवत्ता आहे. गडकिल्ले तसेच इतर पर्यटनस्थळच्या विकासासाठी मंत्रालयात एक व्यापक बैठक होण्याची गरज आहे. त्यासाठी निधी उपलब्ध झाला, तर पर्यटनाला चालना देता येऊ शकेल, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com