रिपोर्ताज

रिपोर्ताज

रिपोर्ताज

99037
कोल्हापूर : बिंदू चौकातील पार्किंगमध्ये जाण्यासाठी लागलेली वाहनांची रांग.
99038
कोल्हापूर : व्हीनस कॉर्नरनजीकच्या गाडी अड्ड्यातील पार्किंगची रिकामी पडलेली जागा.
99039
कोल्हापूर : गोकुळ हॉटेलनजीकच्या पार्किंगमधील अपुऱ्या जागेमुळे अशी वाहने उभी करावी लागतात.


आत येण्याबरोबरच बाहेर जाण्यासाठीही
गाड्यांच्या रांगा
पर्यटकांची भंबेरी; पे अँड पार्कचे नियोजनच नाही
बिंदू चौक शहरातील सध्याचे सर्वात मोठे पे अँड पार्किंग. सुट्या सुरू झाल्याने तिथे येणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्या इतकी वाढलेली की आत येण्याबरोबरच बाहेर जाण्यासाठीही रांग कायम. उन्हाचा तडाखा सावलीतून बाहेर पडू देत नसतानाही पार्किंग भरले व रांगेतील वाहनांना छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या पार्किंगकडे जाण्यास कर्मचारी सांगू लागले. ‘आता आणखी कुठे जायचे’ असे प्रश्‍नचिन्ह पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. नाईलाजाने वाहने बाहेर काढू लागले, त्यात पंधरा ते वीस मिनिटे गेली. रांगेतून आत येत असताना त्या वाहनचालकांना सांगितले असते तर तिथूनच ते बाहेर गेले असते. वेळ वाया गेला नसता. त्याचवेळी गोकुळ हॉटेलनजीकच्या पार्किंगमध्ये जागा मिळण्याची प्रतीक्षा करत वाहने थांबली होती. पण तिथून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या व्हीनस कॉर्नर (गाडी अड्डा) पार्किंगमध्ये एकही वाहन नव्हते. हा प्रकार म्हणजे नियोजनशून्य कारभार दर्शवत होते.
- उदयसिंग पाटील
---------------
दाटीवाटीत उभी करतात वाहने
गोकुळ हॉटेलजवळ केएमटीतर्फे पार्किंग चालवले जाते. तेथील कर्मचाऱ्याने ती लावून घेतली तर तिथे जास्तीत जास्त १५ चारचाकी बसतात. पण प्रवाशांना बाहेरच उतरावे लागते. कारण वाहन आत इतक्या दाटीवाटीने लावले जाते की त्यातून दरवाजा उघडून उतरणे शक्य नसते. गोकुळ हॉटेल तसेच इतर हॉटेलमुळे त्या परिसरात पर्यटकांची तसेच इतर नागरिकांची गर्दी होती. पार्किंग फुल्ल झाले होते, एखादे वाहन बाहेर येते का पहात इतर वाहने रस्त्यावर थांबून होती. त्यामुळे तेथील वाहतूक खोळंबत होती. त्यातच एक चालक वाहन काढायला आला. शेजारचे वाहन इतके लागून उभे केले होते की त्याला वाहनाचा दरवाजाही पूर्ण उघडता आला नाही. यामुळे अनेकदा प्रवाशांना वर्दळीच्या रस्त्यावर उतरून वाहन लावावे लागत होते. या पार्किंगचा फलक आतील बाजूस आहे. नवीन नागरिकाला हे पार्किंग समजतच नाही. हॉटेलमधून माहिती दिल्यानंतर वाहनधारक तिथे येत होते.-------------
एकही वाहन नाही
तिथून पुढे व्हीनस कॉर्नरजवळील गाडी अड्ड्यातील पार्किंगची काय स्थिती आहे हे पाहण्यासाठी गेल्यानंतर प्रथम तिथे पार्किंगची सुविधा आहे हे दाखवणारा फलक रस्त्यावर नाही. त्यामुळे पर्यटकांची वाहने त्याच रस्त्यावरून पुढे जात होती पण त्या ठिकाणी येत नव्हती. प्रवेशमार्गावर असलेल्या कमानीवर फलक आहे, पण त्याकडे लक्ष जाणे शक्यच नाही. आत चक्कर मारली तर सारा परिसर रिकामा होता. त्या परिसरातील संभाजीराव पोवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर तिथे वाहने का उभी केली जात नाहीत हे माहिती नसल्याचे सांगितले. मध्यंतरी प्रयत्न केले होते पण नंतर तिथे काहीच झालेले नाही असे सांगितले.---------
बिंदू चौकातील पार्किंग फुल्ल
बिंदू चौकातील पार्किंगची जागा मोठी असल्याने तेथील स्थिती जाणून घेण्यासाठी चौकात आलो तर आत जाण्याच्या मार्गावर चारचाकींची रांग होती. अनेक वाहनधारक पर्यटकांना भवानी मंडपाजवळ सोडून या पार्किंगमध्ये येत होते. बुरूजाच्या बाजूने वाहने मोठ्या संख्येने उभी होती. दुपारी तीनच्या सुमारास पार्किंग फुल्ल झाले व रांगेत असलेल्या वाहनांना आता जागा नाही असे कर्मचारी सांगू लागले. त्यामुळे आता वाहन कुठे लावू असा प्रतिप्रश्‍न विचारत होते. त्यांना छत्रपती शिवाजी स्टेडियमचा पत्ता सांगत होते. कपाळावर आठ्या पाडत ते वाहन घेऊन जात होते. पाली येथील पर्यटक गणेश दिने यांना येथील नियोजनाबाबतचे मत जाणून घेतल्यानंतर आणखी कर्मचारी आवश्‍यक असल्याचे सांगितले. येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी शिस्त लावली पाहिजे. दुसरीकडील पार्किंगचे ठिकाण माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून पर्यटक येणाऱ्या रस्त्यावरच पार्किंगच्या ठिकाणांचे फलक लावले पाहिजे. तसेच मोठे पार्किंगची गरज अधोरेखित होत आहे.
----------------
व्हीनस कॉर्नर पार्किंगकडे वाहने वळवा
मे महिन्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. त्यासाठी सर्व वाहने बिंदू चौकापर्यंत आणल्यास शहरात वाहतुकीची कोंडी जाणवणार. ते टाळण्यासाठी व्हीनस कॉर्नरनजीकच्या पार्किंगमध्ये वाहने वळवणे आवश्‍यक झाले आहे. त्यासाठी तिथे रस्त्यावरून लक्षात येणारा फलक तसेच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांची मदत घ्यायलाच हवी. तरच पर्यटकांनाही थोडा दिलासा मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com