
कर्मचारी संप स्थगित
महापालिका कर्मचाऱ्यांचा
संप तात्पुरता स्थगित
प्रलंबित महागाई भत्ता, फरक मंजूर
कोल्हापूर, ता. २८ ः प्रलंबित महागाई भत्ता तसेच फरक मंजूर करण्याबरोबरच प्रमुख मागण्यांची पूर्तता झाल्याने महापालिका कर्मचारी संघाने तीन मेपासून पुकारलेला संप तूर्त स्थगित केला.
संघाने संपाची नोटीस प्रशासनास दिली होती. प्रशासक डॉ.कांदबरी बलकडे यांची संघाचे अध्यक्ष संजय भोसले, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात २८ ते ३१ टक्के महागाई भत्त्याचा फरक व ३१ ते ३४ टक्के महागाई भत्त्याचा फरक व ३४ वरुन ३८ टक्के वाढ झालेला महागाई भत्ता एप्रिल पेड इन मे पगारामध्ये समाविष्ट करण्याचे मान्य करण्यात आले. हंगामी कर्मचाऱ्यांची पगारवाढ, ठोकमानधनावरील कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ, वर्ग चारमधून कनिष्ठ लिपीक पदावरील पदोन्नतीची प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करून मुकादम कम क्लार्क व मुकादमची पदोन्नती करण्याचे मान्य झाले. प्रलंबित असलेले गणवेश वाटप, शिलाई भत्ता वाढ, वेळोवेळी वाढ होणारी महागाई ज्या त्या महिन्याच्या वेतनात समाविष्ट करण्याचेही ठरले. अन्य मागण्यांबाबत आर्थिक उपलब्धतेनुसार कर्मचारी संघाबरोबर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरले. इतर मागण्यांबाबत लवकर कार्यवाही ठेवण्याच्या सूचना प्रशासकांनी अधिकाऱ्यांना दिल्या. संघाचे उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे व अजित तिवले, अनिल साळोखे, सिकंदर सोनुले, अभिजित सरनाईक, महादेव कांबळे, मारुती दाभाडे, अन्वर शेख, महेश डफळे आदी उपस्थित होते. उपायुक्त रविकांत आडसुळ, शिल्पा दरेकर, लेखा व वित्त अधिकारी सुनील काटे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कामगार अधिकारी राम अधिकारी, सामान्य प्रशासन अधिकारी प्रशांत पंडत उपस्थित होते.