
मिरवणुकीतील लेसर डोळ्यावर बेतले
लेसर रोषणाईचा वापर डोळ्यांवर बेतला
शहरातील ३० ते ४० तरुणांच्या डोळ्यांना त्रास
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः गेल्या सहा महिन्यांत शहरात विविध सण आणि उत्सवांमध्ये लेसर लाईट्द्वारे आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. प्रमुख मार्गांवरून मिरवणुकाही निघाल्या.
आरोग्यासाठी घातक असणारे लेसर किरण डोळ्यांत गेल्याने अनेकांना त्रास जाणवू लागला. काही काळासाठी अशा लोकांची दृष्टी कमी झाली. गेल्या आठ दिवसांत सुमारे ३० ते ४० तरुणांना हा त्रास जाणवू लागला आहे. सध्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांकडे या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहरात गेल्या आठवड्यात विविध मिरवणुका निघाल्या. यामध्ये हजारो तरुण सहभागी झाले होते. मोठ्या आवाजाची ध्वनी व्यवस्था आणि रंगीबेरंगी लेसर लाईट्स यामुळे रंगत आणण्याचा प्रयत्न आयोजकांना केला; मात्र या लेसर किरणांचा त्रास अनेकांना झाला. गेल्या आठ दिवसांत शहरातील वेगवेगळ्या डॉक्टरांकडे ३० ते ४० तरुण डोळ्यांचे उपचार घेत आहेत. हे सर्व या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. लेसरचे किरण डोळ्यांत जातात, त्यावेळी ते आतील पडद्यावर पडतात. त्यामुळे मॅक्युलर हिमोटेज (रक्तस्त्राव) हा विकार होतो. यामुळे काही काळासाठी रुग्णाची दृष्टी कमी होते. या किरणांमुळे पडद्यावर व्रण तयार झाला तर कायमची दृष्टी कमी होते. मिरवणुकीत गेल्याने या तरुणांच्या डोळ्यांमध्ये लेसर किरण गेले. हे सर्व तरुण १८ ते ३० या वयोगटातील आहेत. मॅक्युलर हिमोटेजचे उपचार करण्यासाठी जे डॉक्टर डोळ्यांची शस्त्रक्रिया करतात त्यांच्याकडे जावे लागले. दृष्टी कमी झाल्यास आयुष्यभर दृष्टी मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनाही दक्षता घेणे गरजेचे आहे.
लेसर किरणे डोळ्यांसाठी अतिशय घातक असतात. यामुळे दृष्टी कमी होते. लेसर किरणे डोळ्यांत गेल्यास त्याचा त्रास काही कालावधीनंतर जाणवू लागतो. लेसर किरणांच्या तीव्रतेवर आणि किती काळासाठी ते डोळ्यांतील पडद्यावर पडले आहेत, त्यावर दृष्टी कमी होण्याचे प्रमाण अवलंबून असते. गेल्या आठ दिवसांत मोठ्या संख्येने असे रुग्ण उपचारांसाठी येत आहेत.
- डॉ. आनंद ढवळे; नेत्र विकार तज्ज्ञ
चौकट
मिरवणुका हव्यातच; पण
विविध सण-उत्सवांमध्ये मिरवणुका हव्याच आहेत. त्यांचा पारंपरिक बाजही जपला पाहिजे. त्यातून लोकांचे प्रबोधनही झाले पाहिजे. या मिरवणुकांमध्ये मात्र आधुनिक उपकरणांचा वापर घेताना काळजी घेतली पाहिजे. विशेषतः त्यातून लोकांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत दक्ष असले पाहिजे. मिरवणुकीत लेसरसारख्या अत्याधुनिक सुविधांचा वापर करताना तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे.