
शहरात पर्यटकांची गर्दी
99664
कोल्हापूर ः रविवारी उन्हाच्या तडाख्यातही राज्यभरातून आलेल्या भाविकांची जुना राजवाडा, भवानी मंडप परिसरापर्यंत दर्शनरांग पोचली.
शहरात पर्यटकांची विक्रमी गर्दी
अंबाबाई मंदिरात तीन दिवसांत दीड लाखावर भाविक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः उन्हाळी सुट्या आणि साप्ताहिक सुट्यांमुळे रविवारी कोल्हापुरात पर्यटक-भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे शहरात असलेल्या ठिकठिकाणची पार्किंग हाउसफुल्ल झाल्याने शिवाजी रोड, टेंबे रोड, दसरा चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, ताराबाई रोड या मार्गावर दुतर्फा पर्यटकांच्या गाड्या पार्क केल्या होत्या. त्यामुळे शहरात सकाळपासूनच ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान, सलग तीन दिवसांत अंबाबाई मंदिरात दीड लाखांवर भाविकांनी हजेरी लावली.
सोमवारी कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्तची सुटी असल्याने शनिवारी रात्रीपासून पर्यटक कोल्हापुरात दाखल झाले. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली. त्यामुळे दर्शनरांग जुना राजवाड्यापासून भवानी मंडपपर्यंत पोचली. दुपारी उन्हाच्या तडाख्यातही भाविकांची मंदिर परिसरात गर्दी कायम राहिली. दरम्यान, अंबाबाई मंदिर, जोतिबा या धार्मिक स्थळांसोबत पन्हाळा, न्यू पॅलेस, राजर्षी शाहू जन्मस्थळ व समाधिस्थळ, खासबाग मैदान, साठमारी, रंकाळा, पंचगंगा नदी घाट, कळंबा तलाव या पर्यटन स्थळांवरही दिवसभर पर्यटकांची रेलचेल राहिली. यामुळे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाऊ गल्लीतही गर्दी दिसत होती. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, कर्नाटक, गोवा येथील पर्यटकांनी शहरात पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला.
-------
चौकट
स्वच्छतागृहे वाढविण्याची मागणी
अंबाबाई मंदिर परिसरातील पागा बिल्डिंगमध्ये असलेली स्वच्छतागृहे भाविकांच्या गर्दीमुळे अपुरी पडत असल्याने महिला पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागली. तसेच खाऊ गल्ली, खासबाग मैदानाजवळ असणाऱ्या स्वच्छतागृहांजवळही हेच चित्र पहायला मिळाले. उन्हाळी सुट्यांमध्ये पर्यटकांची संख्या अजून वाढणार असल्याचे स्वच्छतागृहांचे काम त्वरित व्हावे, स्वच्छतागृहे वाढवावित, अशी मागणी पर्यटकांकडून होत होती.