शहरात पर्यटकांची गर्दी

शहरात पर्यटकांची गर्दी

99664
कोल्हापूर ः रविवारी उन्हाच्या तडाख्यातही राज्यभरातून आलेल्या भाविकांची जुना राजवाडा, भवानी मंडप परिसरापर्यंत दर्शनरांग पोचली.

शहरात पर्यटकांची विक्रमी गर्दी
अंबाबाई मंदिरात तीन दिवसांत दीड लाखावर भाविक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः उन्हाळी सुट्या आणि साप्ताहिक सुट्यांमुळे रविवारी कोल्हापुरात पर्यटक-भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे शहरात असलेल्या ठिकठिकाणची पार्किंग हाउसफुल्ल झाल्याने शिवाजी रोड, टेंबे रोड, दसरा चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, ताराबाई रोड या मार्गावर दुतर्फा पर्यटकांच्या गाड्या पार्क केल्या होत्या. त्यामुळे शहरात सकाळपासूनच ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दरम्यान, सलग तीन दिवसांत अंबाबाई मंदिरात दीड लाखांवर भाविकांनी हजेरी लावली.
सोमवारी कामगार व महाराष्‍ट्र दिनानिमित्तची सुटी असल्याने शनिवारी रात्रीपासून पर्यटक कोल्हापुरात दाखल झाले. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी केली. त्यामुळे दर्शनरांग जुना राजवाड्यापासून भवानी मंडपपर्यंत पोचली. दुपारी उन्हाच्या तडाख्यातही भाविकांची मंदिर परिसरात गर्दी कायम राहिली. दरम्यान, अंबाबाई मंदिर, जोतिबा या धार्मिक स्थळांसोबत पन्हाळा, न्यू पॅलेस, राजर्षी शाहू जन्मस्थळ व समाधिस्थळ, खासबाग मैदान, साठमारी, रंकाळा, पंचगंगा नदी घाट, कळंबा तलाव या पर्यटन स्थळांवरही दिवसभर पर्यटकांची रेलचेल राहिली. यामुळे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खाऊ गल्लीतही गर्दी दिसत होती. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, कर्नाटक, गोवा येथील पर्यटकांनी शहरात पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला.
-------
चौकट
स्वच्छतागृहे वाढविण्याची मागणी
अंबाबाई मंदिर परिसरातील पागा बिल्डिंगमध्ये असलेली स्वच्छतागृहे भाविकांच्या गर्दीमुळे अपुरी पडत असल्याने महिला पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागली. तसेच खाऊ गल्ली, खासबाग मैदानाजवळ असणाऱ्या स्वच्छतागृहांजवळही हेच चित्र पहायला मिळाले. उन्हाळी सुट्यांमध्ये पर्यटकांची संख्या अजून वाढणार असल्याचे स्वच्छतागृहांचे काम त्वरित व्हावे, स्वच्छतागृहे वाढवावित, अशी मागणी पर्यटकांकडून होत होती.

पन्हाळगड पर्यटकांनी फुलला
पन्हाळाः शनिवार, रविवार आणि सोमवारी एक मे ची सुटी अशा तीन सुट्ट्या जोडून आल्या आहेत.. मुलांच्या परीक्षा संपून मे महिन्याच्या सुट्या लागल्या आहेत. साहजिकच ऐतिहासिक पन्हाळगडी पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत. दुचाकी, चारचाकी गाड्यांची लांबलचक रांग येथील प्रवासी कर नाक्यावर लागत असून कर भरून प्रवासी तीन दरवाजा परिसर जवळ करत आहेत. पन्हाळगड दररोज पर्यटकांनी फुलत आहे, फुलणार आहे. साहजिकच एक वर्ष रस्ता नाही म्हणून तर दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैतागलेल्या येथील छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा चेहरा आता फुलू लागला आहे. पर्यटकांना सेवा देताना त्यांचे हात वेगात हालू लागले आहेत.
---
जोतिबा डोंगराला मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप
जोतिबा डोंगर ः ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं...’च्या जयघोषात श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबा डोंगर येथे रविवारची यात्रा मोठ्या भक्तिमय व उत्साही वातावरणात झाली. सलग सुट्यांच्या निमित्ताने आज जोतिबा डोंगराला मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. १० जूनपर्यंत डोंगरावर अशी गर्दी असणार आहे. पाऊस सुरू झाल्यावर गर्दीचा ओघ कमी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com