बाळूमामा पालखी मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळूमामा पालखी मिरवणूक
बाळूमामा पालखी मिरवणूक

बाळूमामा पालखी मिरवणूक

sakal_logo
By

99665
गडहिंग्लज : श्री संत बाळूमामा व श्री हालसिद्धनाथ देवाच्या पालखी मिरवणुकीत २११ ढोल वादन आकर्षणाचे ठरले.


गडहिंग्लजला बाळूमामा पालखी गरप्रदक्षिणा
भंडारा महोत्सव; २११ जणांचे ढोल वादन ठरले लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : गडहिंग्लज शहरात श्री संत बाळूमामा आणि श्री हालसिद्धनाथ पालखीची नगरप्रदक्षिणा हजारो भाविकांच्या सहभागाने उत्साहात झाली. भंडाऱ्‍याची उधळण, चांगभलंचा गजर आणि २११ ढोल वादन आणि आकर्षक आतषबाजी या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. रिंगणे मळ्यातील श्री संत बाळूमामा मंदिरात गेले आठवडाभर भंडारा महोत्सव झाला. प. पू. श्री मल्लिकार्जुन महाराज-भोजकर यांचे श्री संत बाळूमामा यांच्या अमृत चरित्रावरील प्रवचन झाले. शेवटच्या दिवशी संत बाळूमामा व श्री. हालसिद्धनाथ देवाचा पालखी सोहळा झाला.
निडसोशीचे श्री शिवलिंगेश्‍वर महास्वामी, श्री निजलिंगेश्‍वर महास्वामी, श्री भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते पालखी व पाद्यपूजन झाल्यानंतर महाआरती झाली. या वेळी श्री संत बाळूमामा व श्रीहालसिद्धनाथ मंदिर देवस्थान संस्थानचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी स्वागत केले. मान्यवरांचा सत्कार झाला. बसवराज आजरी यांनी प्रास्ताविक केले. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषीकेत शेळके, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वामीजींचे आशिर्वचन झाले. वाघमोडे, शेळके यांची भाषणे झाली. सचिव चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले.
मंदिरापासून निघालेली पालखी मिरवणूक भडगाव रोड, दसरा चौक, लक्ष्मी मंदिर, बाजारपेठ, मेन रोड, आजरा रोड या भागातून फिरुन रिंगणे मळ्यातील मंदिरात त्याची सांगता झाली. या मिरवणुकीत मुक्त हस्ते भंडार्‍याची उधळण करुन चांगभलंच्या गजराने परिसर दणाणून गेला. आकर्षक आतषबाजी आणि २११ ढोल वादनाच्या सादरीकरणाने मिरवणुकीचे आकर्षण वाढले. ठिकठिकाणी पाणी घालून पालखीचे स्वागत होत होते. दर्शनासाठी गर्दी झाली होती. शहरासह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा पालखीची नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर डोणे महाराज यांची भाकणूक झाली. पुजारी बाळासाहेब पडदाळे, विठ्ठल भमानगोळ, राजेंद्र तारळे, बसवराज कोटे, आप्पासाहेब बस्ताडे, जयसिंग पवार, महादेव पडदाळे, बाळासाहेब सुतार, सहदेव पडदाळे, राजू पोवळ, प्रकाश धबाले यांच्यासह भाविक सहभागी झाले होते. दरम्यान, शनिवारी (ता. २९) सकाळपासून महाप्रसादाचे वाटप झाले. हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.