
शिवाजी विद्यापीठात दुषित पाणीप्रश्नी ‘अभाविप’चे आंदोलन
फोटो-00065
......
दुषित पाणीप्रश्नी ‘अभाविप’चे विद्यापीठात आंदोलन
घागर-कळशी मोर्चाने निषेधः आरओ वॉटर प्लांटचे घातले प्रतिकात्मक श्राद्ध
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस आणि वसतिगृहात गेल्या दीड महिन्यांपासून पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी दूषित पाणी येत आहे. त्याविरोधात व्यवस्थापन परिषद, विद्यापीठ प्रशासनाला वारंवार निवेदन देवूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) मंगळवारी विद्यापीठात घागर-कळशी मोर्चा काढला. ‘अभाविप’च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विद्यापीठ इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारात ठिय्या मारत आरओ प्लांटचे प्रतिकात्मक श्राद्ध घातले.
मुलांच्या वसतिगृहापासून सकाळ साडेदहा वाजता मोर्चाने ‘अभाविप’चे पदाधिकारी, कार्यकर्ते विद्यापीठ इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आले. त्यांनी याठिकाणी ठिय्या मारत विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला. वसतिगृहात पुरवठा झालेल्या पाण्यामध्ये आळ्या, शेवाळ, माती आढळून आली. यामुळे मागील महिन्यात अनेक विद्यार्थी आजारी पडले. वारंवार विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासनाने लक्ष दिले नसल्याने ‘अभाविप’ने आक्रमक होत आंदोलन केले असल्याचे महानगर सहमंत्री स्वप्नील पाटील यांनी सांगितले. विजेचे बिल जास्त येते म्हणून आरओ प्लांट बंद असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. असा प्लांट बंद असणे प्रशासनाचे नाकर्तेपणा असल्याचे जिल्हा सहसंयोजक प्रसाद लष्कर यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यासह चर्चेसाठी मुख्य प्रवेशद्वारात यावे असा आंदोलनकर्त्यांनी आग्रह धरला. त्यांनी मुख्य इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षारक्षकांनी रोखले. त्यावर राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे त्याठिकाणी आले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यांचे म्हणणे समजून घेतले. त्यानंतर शिंदे आणि ‘अभाविप’च्या शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यातील चर्चेनंतर आंदोलन थांबविण्यात आले.या आंदोलनात अद्वैत पुंगवकर, वेदांत कुलकर्णी, श्रेयस पाटील, ऋषिकेश कुंभार, अजिंक्य गुरव, समर्पण भिडे, सौरभ पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले.
...........