
शाहूपुरीत खुनी हल्ला
००६९ - घटनास्थळावरून सापडलेले कटर
6७ - हल्लेखोरांनी याच मोटारीची तोडफोड केली.
00066- जखमी पांडुरंग गायकवाड
बांधकाम व्यावसायिकावर
आर्थिक वादातून हल्ला
शाहूपुरीत भरदिवसा प्रकार; तिघांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः आर्थिक देवघेवीतून आज शाहूपुरी पहिल्या गल्लीत भरदुपारी रहदारीच्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकावर खुनी हल्ला झाला. यात पांडुरंग शंकर गायकवाड (वय ५२, रा. केर्ली, ता. करवीर) गंभीर जखमी झाले. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे. त्यांच्या दंड, छाती तसेच कमरेखाली आडवे-तिडवे वार आहेत. त्यांच्या मोटारीचेही दगडाने नुकसान करण्यात आले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी अभिजित गरडसह अन्य दोन अनोळखींवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः गायकवाड मोटारीतून पहिल्या गल्लीत आले होते. तेथे ते, त्यांचे मित्र माजी महापौर सुनील कदम यांच्याशी गप्पा मारत उभे होते. त्यावेळी त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. त्यांच्या मोटारीवर साधारण एक फुटाचा दगड फेकून काच फोडण्यात आली. त्यांच्यावर छोट्या कटरने सपासप वार झाले. मोटारी शेजारी रक्तही सांडले होते. मोटारीत मोठा दगड होता. हल्ल्यानंतर गाडीच्या काचा फोडल्याचे छायाचित्र काढण्यासाठीही तरुण पुढे सरसावले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना तेथून पिटाळले. हल्ला झाल्यानंतर तेथे पळापळ झाली. यामुळे रहदारीच्या ठिकाणी भीतीचे वातावरण झाले.
याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. जखमी गायकवाड यांना सीपीआरमध्ये नेले. शाहूपुरीचे निरीक्षक राजेश गवळी यांनी सीपीआर चौकीत गायकवाड यांची फिर्याद घेतली. गवळी यांनी सांगितले, की गायकवाड यांनी एक मोटार त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला विकली होती. त्यासाठी त्यांनी सुमारे साडेसहा लाख रुपये घेतले होते; मात्र काही कालावधीनंतर संबंधिक मोटार चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी ती मोटार जप्त केली. म्हणून खरेदीदाराने गायकवाड यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली. गायकवाड यांच्याकडून पैसे परत दिले जात नव्हते. ज्यांच्याकडून मोटार घेतली आहे, त्यांनी पैसे दिलेले नसल्याने गायकवाड यांनी मोटार खरेदी केलेल्या व्यक्तीला पैसे दिले नाहीत. या रागातून हल्ला झाला. पोलिस उपनिरीक्षक श्वेता पाटील तपास करीत आहेत.
तीन-चार जण गेले पळून
साधारण चार इंचाच्या कटरने हा हल्ला झाला आहे. हा हल्ला झाल्यानंतर अंदाजे तीन-चार जण पळून गेले आहेत. मात्र, त्या धावपळीत त्यांच्या हातातील कटर तेथेच पडला. कटर आणि त्याचे कव्हर पोलिसांनी जप्त केले आहे.
चुकीची पोस्ट व्हायरल
दरम्यान, या प्रकारानंतर काही पोस्ट व्हायरल झाल्या. याबाबत पोलिसांनी सांगितले, की कदम त्या घटनास्थळी होते, मात्र या घटनेशी त्यांचा काहीच संबंध नाही. रात्री उशिरा एका संशयिताचे नाव पुढे आले आहे. अन्य दोघांची माहिती आणि त्यांचा तपास सुरू आहे.