
बेघरांसाठी रमाई आवास घरकूल योजनेला प्रारंभ
बेघरांसाठी रमाई आवास
घरकूल योजनेला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागार्फे स्वतःचे घर नसलेल्या व बेघर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास घरकूल योजना (ग्रामीण व शहरी क्षेत्र) अशी वैयक्तिक घरकुलाची योजना राबविण्यात येते. ‘जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची’ अंतर्गत हे अभियान राबविण्याचे शासनाने ठरविले असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.
लोंढे म्हणाले, ‘‘२०२३-२४ साठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी प्राधिकारी यांनी वितरित केलेला जातीचा दाखला, महाराष्ट्र अधिवास दाखला, वार्षिक उत्पन्न ग्रामीण विभाग १.२० लाख व शहरी विभाग तीन लाखांपर्यंत मर्यादित असलेला दाखला, रेशनकार्ड, अर्जदार यांच्या नावे ग्रामीणकरीता २६९ चौफुट व शहरी करीता ३० चौरस मीटर घरकूल बांधकामासाठी मोकळी जागा किंवा कच्चे घर असावे. तसेच महानगरपालिका यांनी दिलेला बांधकाम परवाना व शासन निर्णयाप्रमाणे इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन विहीत नमुन्यातील अर्ज तात्काळ ग्रामीण विभागासाठी - पंचायत समितीकडे, शहरी विभागासाठी- नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदकडे व महानगरपालिकेकडे सादर करावेत. याबाबत अधिक माहितीसाठी कार्यकारी अभियंता, महानगरपालिका, कोल्हापूर व इचलकरंजी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका सर्व, गटविकास अधिकारी, सर्व पंचायत समिती किंवा सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ, कावळा नाका येथे संपर्क करावा.’’