कॉंग्रेस आमदार बैठक

कॉंग्रेस आमदार बैठक

00542

आमदार जयश्री जाधव, ऋतुराज पाटील यांच्याकडून मनपा प्रशासन धारेवर
--
थेट पाईपलाईनची कामे मेअखेर पूर्ण करा

कोल्हापूर, ता. ४ ः नगरोत्थान व दलितवस्ती योजनेतून आम्ही सुचवलेली कामे का डावलली, नवीन कामांची यादी कुणाच्या सांगण्यावरून तयार केली, ती कुणी सुचवली, अशा प्रश्नांची सरबत्ती करत कॉंग्रेसच्या आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी आज महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. यादीत आम्ही सुचवलेल्या कामांचा समावेश केला नसल्याबाबत लेखी खुलासा त्वरित द्यावा, अन्यथा अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशाराही दिला. दरम्यान, थेट पाईपलाईनची प्रलंबित कामे मे अखेर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी केल्या.
शहराच्या जिव्हाळ्याची थेट पाईपलाईन तसेच विविध प्रश्नांबाबत आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी इशारा दिला. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
आमदारांनी दिलेली कामांची यादी डावलून, जनतेने नाकारलेल्या लोकांच्या सांगण्यावरून यादी तयार करत असाल तर प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर व काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी दिला. नाकारलेल्या कामाच्या कारणाचा लेखी खुलासा उद्या सकाळपर्यंत द्या अशी सूचना दोन्ही आमदारांनी केली.
रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्याची एकच वर्कऑर्डर काढण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पूर्वी एका ठेकेदाराला सर्व कामे दिल्यानंतर कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. दर्जाही राहिला नाही, हा अनुभव पाहता, प्रत्येक कामासाठी स्वतंत्र ठेकेदाराची नेमणूक करावी. स्थानिक ठेकेदारांना काम द्यावे, अशी सूचना दोन्ही आमदारांनी केली. पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याबद्दलही दोन्ही आमदारांनी अधिकाऱ्यांना सुनावले. झोपडपट्टीतील थकीत पाणी बिलासाठी स्वतंत्र योजना लागू करावी असे शारंगधर देशमुख यांनी सांगितले. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील आणि मी दिलेला प्रत्येकी ५० लाखांचा निधी नाकारलात. आता स्मशानभूमीतील ५० टक्के काम झाले असते, असे आमदार जाधव यांनी सांगितले. आशपाक आजरेकर, नियाज खान, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील, उप शहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन. एस. पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

चौकट
‘दिरंगाई खपवून घेणार नाही’
थेट पाईपलाईनची प्रलंबित कामे मेअखेर पूर्ण करावी, दिरंगाई खपवून घेणार नाही, अशा शब्दात आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ब्रिदीजवळ चार किलोमीटरची भुयारी वीजवाहिनी नेण्याचे काम बाकी असल्याचे युनिटी कन्लटंटने सांगितले. आमदार पाटील यांनी महावितरणच्या परवानगीसाठी ८ मे रोजी बैठक घेऊ. प्रत्येक बैठकीला वेगळा मुद्दा उपस्थित करू नका असे सांगितले. आमदार जाधव यांनी कंपनी जाणीवपूर्वक हा प्रकल्प लांबणीवर टाकत आहे का? अशी विचारणा केली. एका जॅकवेलचा शेवटचा स्लॅब १६ दिवसात तर दुसऱ्याचा स्लॅब ३१ मे पर्यंत पूर्ण करा असे सांगितले.

चौकट
‘दोन बिनमिशांचे वाघ’
महापालिकेत नेहमी दोन बिनमिशांच्या वाघांचा वावर आहे. ते कुठल्या हॉटेलात बसून काम करतात, महापालिकेत येऊन काय करतात, कुणावर दबाव टाकतात. आमदारांना विकासकामांचे उद्‍घाटन करण्याचा अधिकार आहे. कोण त्यात आडवे येत हे सारे माहिती आहे, असा टोला राजेश लाटकर यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com