जयसिंगपूरला उन्हाळी शिबिरांचा धडाका

जयसिंगपूरला उन्हाळी शिबिरांचा धडाका

jsp51jpg
00678
जयसिंगपूर ः उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांना योगासनांसह विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे.

जयसिंगपूरला उन्हाळी शिबिरांचा धडाका
कौशल्यपूर्ण शिक्षणाचे धडे; ग्रामीण भागापर्यंत लोण
जयसिंगपूर, ता. ५ ः शालेय परीक्षा संपल्या. आता सुट्या सुरू झाल्या आहेत. दिवसभर घरात राहणाऱ्या मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी उन्हाळी शिबिराचा पर्याय पुढे आला आहे. शहरात उन्हाळी शिबिरे बहरली आहेत.
काही वर्षांत केवळ शहरापुरते मर्यादित असणारे उन्हाळी शिबिरांचे लोण आता ग्रामीण भागापर्यंत पसरले आहे. शिबिरांमध्ये संस्कार वर्ग, छंदवर्गाचा समावेश आहे. यात विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाबरोबरच आरोगामी, रांगोळी, मेंदी, चित्रकला, योगा, लाठीकाठीसह फिटनेसचे प्रशिक्षण दिले जाते. काही शिबिरांत विद्यार्थ्यांसह पालकांचाही सहभाग असतो. बदलत्या जीवनशैलीत एकत्र कुटुंब पद्धती कालबाह्य ठरून विभक्त कुटुंब पद्धती फोफावू लागली आहे. त्यामुळे घरातील बहुतांश महिला अर्थार्जनासाठी घराबाहेर पडत आहेत. कामाचा व्याप आणि वेळेची कमतरता यामुळे कुटुंबात आता हम दो हमारा एक हे सूत्र रुढ होत आहे. बहुतांश कुटुंबामध्ये एकच अपत्य असते. त्यामुळे सुटीत मुले एकलकोंडी होण्याचा धोका अधिक असतो. त्यांच्या मानसिक आणि सामाजिक विकासाचा प्रश्न पुढे येतो. एरव्ही शाळा सुरू असल्याने अभ्यास, शिकवणी, घरचा अभ्यास यात मुले व्यस्त असतात; मात्र आता शालेय परीक्षा संपल्या आहेत. मुलांच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. दिवसभर घरात राहणाऱ्या मुलांना गुंतवण्यासाठी पालकांकडून छंदवर्गाला पसंती दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहर आणि परिसरात उन्हाळी शिबिरांची चलती सुरू झाली आहे; मात्र काही वर्षांत याला व्यावसायिक स्वरूप आले आहे. यातून शहरी आणि ग्रामीण भागातही अशा शिबिरांना ऊत आला आहे. ग्रामीण भागातील शिबिरांमुळे शहराकडील विद्यार्थ्यांचा ओढा काहीसा कमी झाला आहे. वाढत्या शिबिरांमुळे ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना चालना मिळत आहे. ही एक जमेची बाजू आहे. विद्यार्थ्यांच्या टाईम मॅनेजमेंटसाठी पालकांकडून उन्हाळी शिबिरांकडे कल दिसत आहे.
....
मोबाईलपासून अलिप्त ठेवण्यासाठी
कोरोनात मोबाईलच्या माध्यमातून शिक्षण देण्यात आले. तेव्हापासून मुलांना मोबाईलचे व्यसन जडले आहे. यावर नियंत्रण आणताना पालकांची भंबेरी उडाली आहे. सुटीत मोबाईलपासून अलिप्त ठेवण्यासाठी पालकांकडून मुलांना उन्हाळी शिबिराचा पर्याय पसंत करण्यात आल्याचे प्रकर्षाने लक्षात आले आहे.
....
व्यावसायिक स्वरूप
उन्हाळी शिबिरे मुलांना उपयुक्त असली तरी विविध ठिकाणच्या शिबिरांचे शुल्क समान नाही. प्रशिक्षण एकसारखे असले तरी शुल्क मात्र वेगळे कसे, असा प्रश्न पालकांमध्ये विचारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com