शाहूंना अभिवादन

शाहूंना अभिवादन

राजर्षी शाहू महाराज यांना आज
शंभर सेकंद स्तब्धता पाळून अभिवादन
स्मृती शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त जिल्ह्याभर विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त वैविध्यपूर्ण उपक्रमांतून उद्या (ता. ६) अभिवादन करण्यात येणार आहे. शाहूप्रेमींनी उद्या (ता. ६) सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध राहून अभिवादन करावे, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. यात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, तर्ण मंडळांचे प्रतिनिधी, बँकर्स, ग्राहक, बचत गटांचे सदस्य, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्र व महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीतर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘राजर्षी शाहू छत्रपती : एक समाज क्रांतिकारी राजा’ चरित्र ग्रंथाचे प्रकाशन शाहू सिनेट हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता होत आहे. राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळ येथे सकाळी साडेनऊला अभिवादन केले जाणार आहे. दसरा चौकातील शहाजी छत्रपती महाविद्यालयात प्रा. डॉ. अवनीश पाटील ‘राजर्षींच्या जीवनातील संघर्ष’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. महाविद्यालयातील कर्मवीर वि. रा. शिंदे सभागृहात सकाळी साडेनऊला हे व्याख्यान आहे. कागल येथील शिवराज्य मंच व वनमित्र संस्थेतर्फे निकाली कुस्त्यांचे मैदान आहे. त्यास यशवंत किल्ल्यातील आखाड्यात दुपारी चार वाजता सुरुवात होईल.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी सांगता व कृतज्ञता पर्वानिमित्त महापालिकेतर्फेही अभिवादन केले जाणार आहे. तसेच ६ मे रोजी सकाळी दहा वाजता महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील विठ्ठल रामजी शिंदे चौकात १०० सेकंद स्तब्ध उभे राहून अधिकारी व कर्मचारी अभिवादन करणार आहेत. सकाळी साडेआठला दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास व समाधिस्थळावर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.


M00782 - कोल्हापूर ः येथील शाहू मिलमध्ये बसवण्यात आलेला भोंगा.

शाहू मिलचा भोंगा
दिवसात चारदा वाजणार
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आठवण असलेल्‍या शाहू मिलमधील भोंगा उद्यापासून (ता. ६) दिवसभरात चारवेळा वाजणार आहे. त्यासाठी मावळा ग्रुप व राजर्षी छत्रपती शाहू स्मृती व विचार जतन समितीने सातत्याने पाठपुरावा केला होता. तो कायमस्वरूपी वाजत राहावा, यासाठी उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यातून मिलमधील जागा उपलब्ध झाली. वीजपुरवठाही करण्यात आला. टायमर लावला असून दिवसभरात चारवेळा तो आपोआप वाजणार आहे. सकाळी दहा, अकरा, दुपारी तीन व सायंकाळी सहा अशा वेळी भोंगा वाजत राहणार आहे. शनिवारी (ता. ६) सकाळी अकरा वाजता मंत्री पाटील व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत भोंगा वाजवला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com