
शाहू महाराज
गिरगावातील राजर्षी शाहूंच्या स्मृतीस्तंभासाठी
महापालिकेने सुविधा द्याव्यात ः डॉ. निलम गोऱ्हे
कोल्हापूर, ता. ५ : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे निधन झालेल्या मुंबईतील गिरगाव परिसरातील खेतवाडी गल्ली १३ मध्ये महापालिकेने उभारलेल्या स्मृतीस्तंभासाठी आवश्यक सुविधा देण्याबरोबरच योग्य डागडुजी करावी. त्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.
स्मृतीस्तंभाची दुर्दशा झाल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी उपसभापती कार्यालयाबरोबरच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. स्तंभाच्या ठिकाणी आवश्यक रंगरंगोटी, सुरक्षा व्यवस्था, दिवे आणि नियमित स्वच्छता करण्यास सांगितले आहे. स्तंभाच्या ठिकाणी सर्व सुविधा तातडीने करून दिल्या जातील, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
डॉ. गोऱ्हे यांनी या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देण्याचे निर्देश मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले. त्यानुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. महापालिका अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, सहाय्यक आयुक्त शरद उघडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खुडे यांनीही तातडीने काम होईल, असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत पवार, युवा सेनेचे रोहीत महाडिक उपस्थित होते. स्मृतिदिनी उपसभापती कार्यालयातर्फे अभिवादन करण्यात येणार आहे.