
झीरो शॅडो डे चा अनुभव
01026
कोल्हापूर : शाहू मिलमध्ये निरनिराळ्या शास्त्रीय उपकरणे वापरून उपस्थित लोकांना शून्य सावलीबाबत शास्त्रीय महिती देताना प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर.
कोल्हापूरवासीयांनी अनुभवला शून्य सावली दिवस
कोल्हापूर, ता. ६ : आपली सावली कधीच आपली साथ सोडत नाही; मात्र आज दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंदापासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत म्हणजे, ५० सेकंदापर्यंत स्वत:चीच सावली अदृश्य झालेली पाहायला मिळाली. खगोल शास्त्रात या घटनेला शून्य सावली अथवा झिरो शॅडो असे म्हणतात.
विवेकानंद महाविद्यालयातील खगोलशास्त्र विभागामार्फत प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थ्यांसमवेत राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाच्या सांगता निमिताने शाहू मिलमध्ये निरनिराळ्या शास्त्रीय उपकरणे वापरून उपस्थित लोकांना शून्य सावलीबाबत शास्त्रीय महिती दिली. इंडेक्स पिन, रीतोर्ड स्टँड, मेजरींग सीलेंडर, बार मॅग्नेट, लेव्हल बॉटल, बॉटल आदी शास्त्रीय उपकरणांची सावली नाहीशी झालेली लोकांनी अनुभवली. तसेच पन्नास सेकंदासाठी स्वतःची अदृश्य झालेली सावली लोकांनी अनुभवली.
डॉ. कारंजकर म्हणाले, ‘‘कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दोन वृत्तांच्या मध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षांतून दोन वेळेला हा शून्य सावलीचा आनंद घेता येतो; मात्र जे लोक कर्कवृत्त, मकरवृत्त आणि विषुववृत्त या ठिकाणी राहतात त्यांना वर्षातून एकदाच शून्य सावली दिवसाचा आनंद घेता येतो तर कर्कवृत्ताच्या वरच्या भागात आणि मकरवृत्ताच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना मात्र शून्य सावली दिवसाचा आनंद घेता येत नसतो.’’