इचल: मुख्य अंकासाठी

इचल: मुख्य अंकासाठी

महावितरणच्या यंत्रमागधारकांना नोटीसा

पोकळ थकबाकीवरील दंड व व्याज भरण्याची सूचना ः मुदतीनंतर वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा

इचलकरंजी, ता.६ ः आॅनलाईन नोंदणीतील गोंधळातून निर्माण झालेला यंत्रमागधारकांच्या पोकळ थकबाकीचा प्रश्न यापूर्वीच निकालात निघाला आहे. पण या पोकळ थकबाकीवरील दंड व व्याज आकारणीतून यंत्रमागधारकांची सुटका झालेली नाही. याबाबत महावितरण कंपनीने संबंधित यंत्रमागधारकांना नोटीसा लागू केल्या असून व्याज व दंडाची थकबाकी भरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योगात खळबळ उडाली आहे.
वीज सवलत मिळण्यासाठी यंत्रमागधारकांना आॅनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आली होती. पण ही किचकट प्रक्रिया असल्यामुळे अनेकांनी नोंदणी केली नव्हती. त्यामुळे शहरातील सुमारे तीन हजार यंत्रमागधारकांची वीज सवलत बंद करण्यात आली होती. त्यामुळे दोन महिन्यांची बिले वाढून आली होती. त्यानंतर तत्कालीन शासनाने वीज सवलत कायम केली. त्यामुळे दोन महिन्यांची पोकळ थकबाकी सुमारे वर्षभर संबंधित यंत्रमागधारकांच्या बिलांतून येत होती. या थकबाकीची टांगती तलवार दूर करण्याची मागणी यंत्रमागधारकांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे केली होती.
खासदार माने यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन पातळीवर प्रयत्न केले. त्यानंतर संबंधित यंत्रमागधारकांच्या वीज बिलांतून पोकळ थकबाकी कमी झाली. पण त्यावर आकारणात आलेल दंड व व्याजाची रक्कम बिलात कायम ठेवण्यात आली. ही थकबाकी भरण्यासाठी आता महावितरण कंपनीने संबंधित यंत्रमागधारकांना नोटीसा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये थकबाकी न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोकळ थकबाकीप्रमाणेच व्याज व दंड आकारणीची थकबाकी शासन पातळीवरुन निकालात काढण्याची मागणी होत आहे.
-----

सुमारे ५० लाखांची थकबाकी

शहरात सुमारे तीन हजार यंत्रमागधारकांची व्याज व दंडाची सुमारे ५० लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी महावितरणकडून नोटीस देण्यात येत आहे. त्यामध्ये १५ दिवसांची मुदत दिली आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास दुसरी नोटीस न देता वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे. पुन्हा वीज पुरवठा सुरु करण्यासाठी नियमाप्रमाणे पुर्नजोडणी भार आकारणी करावी लागेल, असे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांची कोंडी झाली आहे.
-----

‘पोकळ थकबाकी करण्याचा निर्णय यापूर्वीच शासनाने घेतला आहे. त्यानुसार पोकळ थकबाकीची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार व्याज व दंड आकारणी रद्द होणे आवश्यक आहे. पण तसे न करता व्याज व दंड न भरल्यास महावितरण वीज पुरवठा खंडीत करण्याची चुकीची कृती करीत आहे.

विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com