
कोल्हापुरात ७१७५ विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ परीक्षा
फोटो-01134
.............
कोल्हापुरात ७१७५ विद्यार्थ्यांनी दिली ‘नीट’ परीक्षा
१०८ जण गैरहजर; केंद्राबाहेर पालकांची गर्दी
कोल्हापूर, ता. ७ ः वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पातळीवरील सामाईक प्रवेश परीक्षा (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) रविवारी कोल्हापुरातील दहा केंद्रांवर झाली. या केंद्रांतून परीक्षा देण्यासाठी ७२८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७१७५ जणांनी परीक्षा दिली, तर १०८ जण गैरहजर राहिले. यावर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येमध्ये वाढ झाली.
या परीक्षेसाठी कोल्हापूर शहरातील कमला कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, डी. वाय. पाटील विद्यानिकेतन, तर जिल्ह्यातील संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (गडहिंग्लज), केआयटी कॉलेज (गोकुळ शिरगाव), संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, पॉलिटेक्निक (अतिग्रे), डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस (तळसंदे), मगदूम पब्लिक स्कूल (निमशिरगाव) केंद्रे होती. या केंद्रांमध्ये दुपारी १२ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरूवात झाली. प्रवेशपत्र, ओळखपत्र पाहून बायोमेट्रिक हजेरी नोंदवून त्यांना केंद्रात सोडण्यात आले. ठरवून दिलेल्या ड्रेसकोडमध्ये विद्यार्थी आले होते. दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजून २० मिनिटे यावेळेत परीक्षा झाली. त्यात ७२० गुणांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषयांतील प्रश्न होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, आदी भाषेतून परीक्षा घेण्यात आली. यावर्षी कोल्हापुरातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६७१ ने वाढली. दरम्यान, या परीक्षेसाठी बहुतांश विद्यार्थी त्यांच्या पालकांसमवेत आले होते. दुपारी उन्हाच्या तडाख्यात सावलीचा आधार घेवून पेपर सुटेपर्यंत ते केंद्राबाहेर थांबून होते.
..........
‘यावर्षी कोल्हापुरातून ‘नीट’ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने परीक्षा केंद्रांची संख्या देखील वाढली. व्यवस्थितपणे परीक्षा पार पडली.
-शिल्पा कपूर, शहर समन्वयक, नीट परीक्षा
..............................
विद्यार्थी काय सांगतात?
‘गेल्या वर्षीपेक्षा यंदा पेपर चांगला होता. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमधील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम असल्याचे मला जाणविले.
-अनंत शेट्टी, इचलकरंजी
................
‘पेपर बरा गेला आहे. परीक्षा झाल्याने गेल्या वर्षभरापासूनचा अभ्यासाचा आज तणाव कमी झाला आहे.
-कस्तुरी केसरकर, गोकुळ शिरगाव
.....................................
परीक्षेला १६ दिव्यांग विद्यार्थी
यंदा १६ दिव्यांग विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांना १ तास ५ मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला होता. दरम्यान, या परीक्षेला जे विद्यार्थी बूट घालून आले होते. त्यांना ते केंद्राबाहेर काढावे लागले. केंद्राच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात होता.