वाचक पत्रे

वाचक पत्रे

---------------------------
शाहूपुरी रेल्वे फाटकाजवळ दिशादर्शक पाटी
शाहूपुरीतून रेल्वेफाटक ओलांडून स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांना दोन्ही बाजूंनी भिंत घातल्याने स्टेशनवर जाता येत नाही; परंतु भाजी मंडईतून स्टेशनवर जाण्यासाठी जी वाट आहे, ती वाट अनेक लोकांना माहीत नाही. यासाठी फाटकाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक त्वरित लावण्याची गरज आहे, संबंधित अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.
सदानंद ठाकूर, कोल्हापूर
-----------------------------------
मध्यम मार्ग काढावा
कोकणात सेवेच्या माध्यमातून बत्तीस वर्षे काढली; पण कोकणचा विकास झाला असं काही दिसलं नाही. नवनवीन प्रकल्प येऊ घालतात; पण त्या प्रकल्पांना या ना त्या कारणाने खो घातला जातो. मोठमोठे प्रकल्प आल्याशिवाय आपला कोकण विकसित कसा होणार, याचे कोडे आहे. आंबा, काजू, नारळ, पोकळी, ही फळलागवड कोकणात होते; पण कारखाने नसताना सद्याच्या हवामान बदलाने त्यांचेही उत्पन्न घटत चालले आहे. शेतीचे उत्पन्न ही नगन्यच असते. मग आमचा कोकणचा तरुण मुंबईकडे वळतो आहे. रत्नागिरीच्या जनतेनी आपल्या भावी पिढीचा विचार करावा व त्यांच्यावर चाकरमानी हा धब्बा बसला आहे तो काढून टाकावा व येणाऱ्या प्रकल्पांबाबत साधक-बाधक विचार करून मार्ग काढावा.
रावसाहेब शिरोळे, रुकडी
----------------------------
मातीची भांडी उपयुक्त
मातीच्या भांड्यात पाणी पिणे, अन्न शिजवणे आरोग्यदायी मानले गेले आहे. माती ही सर्वात शुद्ध व रोग दूर करणारी असे म्हणतात. काहीजण माठाचा उपयोग पालेभाज्या टिकून राहण्यासाठी करतात. तसेच माठातील पाणी तहान शमविण्याचे काम करते. तसेच खोकला, सर्दी व पचनास उपयुक्त मानले जाते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मातीच्या मोठ्या रांजणाचा उपयोग पाणी थंड करण्यासाठी केला जातो व त्यात वाळा टाकून पाणी पिल्यास पाणी थंड व सुमधूर लागते.
रावसाहेब शिरोळे, रुकडी
----------------------------
उद्‌बोधक बोधकथा
‘सकाळ’मध्ये रोज प्रसिद्ध होणाऱ्या स्वास्थ्यम या सदरामध्ये रोज प्रसिद्ध होणाऱ्या बोधकथा वाचनीय आणि उद्‌बोधक आहेत. या बोधकथा मुलांसाठी माहितीचा खजिनाच आहेत. प्रशांत सरुडकर यांचा प्रत्येक लेख जीवनामध्ये कसे वागायचे, हे शिकवतो. या बोधकथांचे पुस्तक व्हावे आणि घरोघरी जावे हीच अपेक्षा.
जे. एस. पोवार (सातवेकर), इचलकरंजी
------------------------------------------
हास्य फुलवते जीवन
हसणं हे मानवाला लाभलेलं एक अनमोल वरदान आहे. सर्व प्राणिमात्रात एकच मनुष्यप्राणी असा आहे की जो आपल्या चेहऱ्यावर हास्य दाखवून आनंद व्यक्त करू शकतो. हास्य केवळ आनंदाचे प्रतीकच नाही, तर तो उत्तम व्यायाम आणि कोणताही मोबदला नसलेले बहुगुणी औषध आहे. हास्यासारखं दुसरं टॉनिक नाही. हास्यामुळे आपणास प्रसन्नता लाभते. सर्व रोगांवर हास्याचा औषधाप्रमाणे उत्तम प्रभाव पडतो हे सर्व शास्रज्ञांनी आज सिद्ध केले आहे. हास्य स्वास्थ्यासाठी अमृत आहे. तन आणि मनाच्या रोगांसाठी एक स्वस्त आणि प्रभावशाली उपचार आहे. हसणं एक मानवीय लक्षण आहे. हसल्यामुळे मेंदूपासून संपूर्ण नाडीमंडल आंदोलित होते आणि फुफ्फुसातील अशुद्ध हवा शरीरातून बाहेर पडते. वेगवेगळ्या मारुपेशी सुरळीतपणे सक्रिय होतात. वेदना कमी होणे, अशा अनेक रोगांवर आणि समस्यांवर हास्य हा रामबाण उपाय आहे. सुप्रसिद्ध मानसशास्रज्ञ डॉ. विल्यम फ्राय यांच्या मते हास्याशिवाय जीवन नाही, तर लंडनचे मानसशास्रज्ञ डॉ. जॉन गोमेझ यांच्या मते मानसिक तणाव दूर करण्यासाठी हास्यासारखे दुसरे औषध नाही. त्यामुळे हसत रहावे आणि आनंदी जगावे.
प्रा. प्रमोद झावरे.
-------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com