education Shivaji University
education Shivaji Universityesakal

Shivaji University : शिनोळीतील केंद्रात अवघ्या ९ विद्यार्थ्यांनी घेतले कौशल्य

शिवाजी विद्यापीठाच्या शिनोळीतील केंद्रातील चित्र; अभ्यासक्रमांची तयारी; सीमाभागातून फारसा नाही प्रतिसाद

-संतोष मिठारी

कोल्हापूर : सीमाभागातील युवक-युवतींना कौशल्य व उद्योजकता विकासाची संधी मिळावी या उद्देशाने राज्य शासनाने सकारात्मक कार्यवाही केली. त्यावर पुढे शिवाजी विद्यापीठाने स्वःनिधीतून चंदगड तालुक्यातील शिनोळी याठिकाणी कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राची वर्षभरापूर्वी सुरूवात केली.

अभ्यासक्रम, तज्‍ज्ञ शिक्षकांची नियुक्ती, भाडेतत्त्वावर इमारत घेवून आवश्यक तयारी करून केंद्रातून पाच अभ्यासक्रमांचा प्रारंभ केला. मात्र, प्रशिक्षणाला सीमाभागातील विद्यार्थ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वर्षभरात अवघ्या ९ विद्यार्थ्यांनी काजू प्रक्रिया उद्योग व विक्रीच्या कौशल्याचे धडे गिरविले.

३१ विद्यार्थ्यांची नावनोंदणी
शिनोळीतील वसंत विद्यालयात विद्यापीठाने कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, आजीवन अध्यन व विस्तार विभाग आणि लोकविकास केंद्राअंतर्गत कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षणाचा १ एप्रिल २०२१ ला प्रारंभ केला. प्रशिक्षणासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित केला. काजू प्रक्रिया उद्योग व विक्री, बटाटा व रताळी प्रक्रिया उद्योग व विक्री, टॅली,

ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले. त्यातील ट्रॅव्हल्स अँड टुरिझम वगळता उर्वरित चार अभ्यासक्रमांसाठी एकूण ३१ विद्यार्थ्यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये नावनोंदणी केली. मात्र, त्यातील काजू प्रक्रिया अभ्यासक्रमाच्या अवघ्या ९ विद्यार्थ्यांनीच प्रशिक्षण घेतले. पहिली बॅच असल्याने या विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्कही घेतले नाही. अन्य विद्यार्थ्यांनी नावनोंदणीच्या पुढे काहीच केले नाही.

गरज लक्षात घेवून प्रशिक्षण
सीमाभागातील स्थानिक युवक-युवतींमध्ये कौशल्य व उद्योजकता विकास व्हावा. त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने स्थानिक भागाची गरज आणि उपयुक्तता विचारात घेवून प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले असल्याचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव यांनी सांगितले.

या केंद्राअंतर्गत अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी सीमाभागातील विविध गावांमधील ग्रामस्थांशी बोलून वनौषधी संकलन, दुग्ध, शेती व्यवसाय, पेस्ट मॅनेजमेंट, कोकम, मेवा, मका प्रक्रिया, मधनिर्मिती, सहकार प्रशिक्षण असे वेगवेगळे २७ अभ्यासक्रमांचे नियोजन केले. पहिल्या टप्प्यात काजू, बटाटा व रताळी प्रक्रिया, टॅली असे पाच अभ्यासक्रम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुले, महिला बचत गटांशी संवाद
या केंद्रातील अभ्यासक्रमांना प्रवेशित होवून अधिकजणांनी कौशल्य प्रशिक्षण घ्यावे यासाठी विद्यापीठाने सीमाभागातील विविध गावांतील ग्रामपंचायती, शाळांच्या माध्यमातून आठवी ते दहावीच्या मुलांचे प्रबोधन केले. महिला बचत गटांतील सदस्यांशी संवाद साधून त्यांना या केंद्रातील अभ्यासक्रमांची माहिती दिली आहे.

या केंद्राच्या परिघातील गावे
या कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या ३५ किलोमीटरच्या परिघामध्ये विविध गावे येतात. त्यात शिनोळी बुद्रुक, कोलीक, हाजगोळी, सरोळी, हिंडगाव, ढेकोळी, सुरूते, शिनोळी खुर्द, तुडीये, देवरवाडी, महिपाळगड, सुंडी, बेळवट्टी, कल्लेहोळ, बाची, उचगाव, कुद्रेमणी, आदी गावांचा समावेश आहे.

फेर सर्वेक्षण करण्याची गरज
अभ्यासक्रम, तज्ज्ञ मार्गदर्शक, स्वतंत्र वर्ग खोली, प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण आदी स्वरूपातील तयारी करूनही विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळत असेल, तर शिवाजी विद्यापीठाने पुन्हा एकदा सर्वेक्षण करायला हवे. केंद्राचे ठिकाण, वेळ, अभ्यासक्रमांबाबत जाणून घेवून त्यानुसार बदल करणे आवश्‍यक ठरणार आहे. नवे शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू होते. त्यापूर्वी सर्वेक्षण होणे आवश्‍यक आहे.

कदाचित यामुळे प्रशिक्षणाकडे पाठ
सीमाभागातील विविध गावांमधील इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतचे अनेक मुले प्लबिंग, गवंडी, सेट्रिंगची कामे करण्यासाठी बेळगावला जाण्यास प्राधान्य देतात. कदाचित त्यामुळे या कौशल्य विकास केंद्रातील प्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे अशी मुले पाठ फिरवित असतील.

सीमाभागातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण, प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने शिवाजी विद्यापीठाने शिनोळीमध्ये केंद्र सुरू केले. मात्र, त्याठिकाणी प्रशिक्षणासाठी प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कोणत्या कारणाने कमी आहे ते शोधण्यासाठी विद्यापीठाने समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
-डॉ. विलास शिंदे, प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ

काजू प्रक्रिया उद्योग-विक्रीचे प्रशिक्षण या केंद्राच्या माध्यमातून मी घेतले. मला चांगली माहिती, प्रशिक्षण मिळाले. ते उपयुक्त ठरले. विद्यापीठाने सुरू केलेले अभ्यासक्रम चांगले आहेत. मात्र, शिनोळीतील हे केंद्र वाहतुकीच्यादृष्टीने सोयीस्कर ठरत नाही. चंदगड तालुक्यातील मध्यवर्ती आणि एमआयडीसीजवळ असलेल्या पाटणेफाटा सारख्या ठिकाणी असे केंद्र झाल्यास ते अधिक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.
-रामकृष्ण बसरगेकर, विद्यार्थी, बसरगे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com