रिपोर्ताज - सेंद्रिय शेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपोर्ताज - सेंद्रिय शेती
रिपोर्ताज - सेंद्रिय शेती

रिपोर्ताज - सेंद्रिय शेती

sakal_logo
By

रिपोर्ताज
संदीप खांडेकर
12786; 1278५; B12787

मठावरचा मळा
सेंद्रिय पिकांनी फुलला

सिद्धगिरी मठाची घरपोच सेवा; आरोग्यही अन्‌ पैसाही

कसबा बावड्यातल्या रविवारचा आठवडी बाजार ग्राहकांच्या गर्दीने हाऊसफुल्ल. ‘तुम्ही विकत असलेला सेंद्रिय आहे का,’ ग्राहकाचा थेट भाजी विक्रेत्याला प्रश्‍न. ‘नाही,’ असे त्याचे उत्तर येताच तो दुसऱ्या विक्रेत्याकडे गेला. त्याच्याकडे सेंद्रिय भाजीपाला असल्याने, ग्राहकाने त्याची खरेदी केली. दरात घासाघीस न करता त्याने पैसे दिले. विक्रेत्याकडे जाऊन भाजीपाल्याबाबत अधिक चौकशी केली. ‘घरची शेती हाय. त्यात रासायनिक खत टाकत न्हाई. गाई-म्हशीच्या शेणाचं खत शेतात वापरतोय. भाजीपाल्यावर औषध फवारणीबी करत न्हाई. सांगल त्यो दर ग्राहक देतोय. कणेरी मठावरची सेंद्रिय शेती बघून या एकदा.’ त्याचे बोलणे ऐकून थेट कणेरीमठ गाठले.
.................

रचनात्मक पद्धतीची भाजीपाला शेती...
कोल्हापूरपासून काही अंतरावरचे हे ठिकाण. सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ, शाहू नाका, गोकूळ शिरगावमार्गे मठावर पोचता येते. आर. के. नगरातून कंदलगावमार्गे मठावर पोचण्याचा दुसरा मार्ग आहे. आम्ही कंदलगावातून मठावर पोचलो. काडसिद्धेश्‍वर महाराजांच्या निवासस्थानाचे नाव शिवालय. त्याच्या खालच्या उतारावर रचनात्मक पद्धतीने सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड नजरेत भरली. वेलीवर लटकलेले दोडके, काकडी, पडवळ, भोपळा, भेंडी, वांगी, कोबी, फ्लॉवर दिसले. गहू व भाताच्या शेतीत आंतरपिक घेण्याची पद्धत अनोखी दिसली. काही महिला रखरखत्या उन्हात पिकांना पाणी घालत होत्या. ‘शेती सेंद्रिय म्हणजे काय?,’ या प्रश्‍नावर ‘रासायनिक खत वापरत न्हाईत हो यात,’ एवढेच उत्तर त्यांनी दिले. या उत्तराने समाधान होणारे नव्हते. सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञ (कृषी विद्या) पांडुरंग काळे, विशेषज्ञ (कृषी विस्तार) सुनील कुमार यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले, ‘सेंद्रिय शेतीसाठी देशी गाय महत्त्वाची. तिच्यापासून मिळणारे शेण, गोमूत्र, ताक, दूध, दही, तूप यांचा वापर शेतीसाठी केला जातो.’

बीजामृत व जीवामृताचा शेतीत वापर....
काडसिद्धेश्‍वर महाराज यांनी सिद्धगिरी नॅचरल्स फॉमर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली असून, त्याद्वारे सेंद्रिय भाजीपाला पिकवला जातो. द्रवरूप सेंद्रिय खतात बीजामृत व जीवामृताचा समावेश होतो. बीजामृत तयार करण्यासाठी पाच किलो गायीचे ताजे शेण फडक्यात बांधून ठेवले जाते. मोठ्या बादलीत ५० लिटर, पशरी घेऊन त्यात बांधलेले फटके ५ किलो गायीचे ताजे शेण बुडवून रात्रभर ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी ५ किलो गायीचे शेण ५० लिटर पाऱ्यात पिळून घेतले जाते. शेणाच्या द्रावणात ५ लिटर गोमूत्र घालून दुसऱ्या भांड्यात ५ लिटर पाणी घेतले जाते. त्यात ५० ग्रॅम चुन्याचे द्रावण तयार करून वस्त्रगाळ द्रावणवरील गायीच्या शेण व गोमूत्राच्या द्रावणात घातले जाते. त्यात बियाणे एक मिनिट बूडवून सावलीत सुकवून नंतर त्याची पेरणी केली जाते. रोपापासून किंवा कांड्यापासून पिकाची लागण करायची असल्याची रोपे किंवा कांड्या द्रावणात एक मिनिट बुडवून लागण होते. जीवामृत जैविक प्रक्रियेतून तयार झालेले द्रवरूप सेंद्रिय खत उत्तम आहे. येथे गांडूळ खतही तयार होते.

सिद्धगिरी लखपती शेती मॉडेल....
काडसिद्धेश्‍वर महाराज कृषीविषयक कार्यक्रमात विशेष अतिथी असतील, तर सिद्धगिरी लखपती शेतीचा जरूर उल्लेख करतात. वर्षभर लागणारा शेतीमालाचे एक एकरात उत्पादन घेण्यासाठी २०१४ला सिद्धगिरी लखपती शेती मॉडेल तयार केले आहे. त्यात शेतकऱ्याचे घर, गोबर गॅस, छतबाग, गायीचा गोठा, सौर पॅनल, परसबागेचा समावेश आहे. खरीप, रब्बी, उन्हाळी अशा तिन्ही हंगामात मिश्र पिक पद्धतीने शंभरपेक्षा जास्त पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यात भाजीपाला, फुले, फळझाडे, भाजीपाला, तृणधान्य, कडधान्य, मसाला पिके, औषधी वनस्पती, गळीत धान्यांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करून एक लाखापेक्षा जास्त निव्वळ नफा कसा मिळवता येतो, हे कृतीतून दाखवले आहे. चंदन, ऊस, सोयाबीन पिकांसह शेकडो फळझाडे लावली आहेत. सेंद्रिय शेतीचे ज्ञान शेतकऱ्यांना होण्यासाठी दोन महिन्यांतून कार्यशाळा घेतली जाते.

सेंद्रिय भाजीपाल्याची घरपोच सेवा...
रासायनिक व्याधींपासून मुक्तता मिळावी, यासाठी सेंद्रिय भाजीपाल्याची मागणी वाढत आहे. थेट लोकांपर्यंत तो पोचवण्याची सुविधा सिद्धगिरी मठाने केली आहे. भाजीपाल्याचा टेंपो फिरून भाजीविक्री केली जाते. शहरी नागरिकांतून त्याला मागणी असून, आज टेंपो कोणत्या भागात येणार, याकडे ते लक्ष देऊन असतात. विशेष म्हणजे हा भाजीपाला वर्षभर एकाच दरात उपलब्ध असतो. विषमुक्त, आरोग्यास उपयुक्त, स्वाद व रोगमुक्त भाज्यांसाठी आगाऊ नोंदणी करून घेतली जाते.
-----------
सेंद्रिय भाजीपाल्यासाठी संपर्क :
दूरध्वनी : ०२३१ - २६८४१०७, २६८४१०९
मोबाईल : ९३७३२८७६०९, ९३७०१७२८७१