
भूविकास बॅंक देय रक्कम खात्यावर
‘भूविकास’च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची
बारा कोटींची रक्कम खात्यावर जमा
कोल्हापूर, ता. १० ः जिल्ह्यातील भूविकास बॅंक कर्मचाऱ्यांची गेल्या दहा वर्षांपासून सेवानिवृत्तीची रक्कम मिळाली नव्हती. त्याबाबतच्या पाठपुराव्यानंतर शासनाने ही रक्कम आदा करण्याबाबतचा मंत्रिमंडळात निर्णय घेतला आणि त्यानुसार आज दोनशे आठ कर्मचाऱ्यांची बारा कोटी २१ लाख पंधरा हजार इतकी रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर आता देय रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा उपनिबंधक तथा बॅंकेचे अवसायक निळकंठ करे यांचा सत्कार बॅंकेचे व्यवस्थापक एन. वाय. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. संजय मदने, रमाकांत टाकळकर, एच. एन. पाटील, सुनीता चेंडके, विष्णू पाटील, सुधीर शिंदे, बाळू पाटील, जालंदर पाटील, सुधीर पाटील, वसंत पाटील आदी उपस्थित होते. व्ही. आर. कुलकर्णी यांनी स्वागत केले.