
सोलारवरील पाणी योजना (मालिका भाग १)
लोगो - पाण्याला ''सौर''चा आधार - भाग १
इंट्रो
जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला विविध स्त्रोतातून पाणीपुरवठा केला जातो; मात्र हे सर्व पाणी नदी, बोअरवेल, विहिरी, जलसिंचन योजनेतून घरापर्यंत येण्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासते. विजेचे बिल हा नेहमीचा वादाचा विषय राहिला आहे. दरवर्षी थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार घडतो. या सर्वाला फाटा देवून पाणी योजनाच सौर उर्जेच्या माध्यमातून चालवण्याचे धोरण जिल्हा परिषदेने घेतले आहे. त्याचा मालिकेच्या माध्यमातून घेतलेला आढावा.....
विजेच्या कटकटीला पाणी योजनांचा `रामराम''
जिल्ह्यातील ४३३ पाणी योजना सौरउर्जेवर; ३५ कोटींची तरतूद
सदानंद पाटील - सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.९ : कधी भारनियमन तर कधी थकबाकीमुळे होणारा खंडित पाणीपुरवठा, ही गावोगावची कहाणी आहे. पाणी न मिळाल्याने वा कमी दाबाने उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांकडून लोकप्रतिनिधींची होणारी शाब्दिक धुलाईदेखील नवीन नाही. गावाच्या पाणी योजनेत विजेची भूमिका महत्वाची राहिली आहे. गावाला पाणी मिळाले नाही की, त्याचे पडसाद जिल्हा परिषदेपर्यंत उमटतात. यामुळेच जल जीवन मिशनची आखणी करताना शक्य त्या पाणी योजना या सौर उर्जेवरच चालवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला.
जिल्ह्यात जल जीवन अंतर्गत एक हजार २०५ योजना घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी विजेच्या बिलाचा मोठा अडथळा होता. थकबाकी भरली नसल्याने नवीन वीज कनेक्शन देण्यास महावितरणने विरोध केला. पाणी योजनांनीही महावितरणचे ३१ ऑगस्ट २०२१ अखेर जवळजवळ १०० कोटी रुपये थकवले होते. यातूनच महावितरण, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत असा संघर्ष निर्माण झाला होता. दरवर्षी असाच गोंधळ होत असल्याने जिल्हा परिषदेने पाणी योजनाच सौर उर्जेवर घेण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच १२०५ पैकी तब्बल ४३३ पाणी योजनांसाठी सौर उर्जेसाठी तरतूद करुन जिल्हा परिषदेने राज्यात ठसा उमटवला आहे. यातील काही योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु आहे. सर्व योजना सौर उर्जेवर सुरु होतील, त्यावेळी फार मोठे बदल पहाण्यास मिळणार आहेत.
तालुका निहाय पाणी योजना व त्यातील सोलार योजनांसाठी असलेली तरतूद:
तालुका योजनांची संख्या सोलार योजना रक्कम तरतूद
आजरा ८४ २१ १ कोटी ६८ लाख
भुदरगड १०४ ६० ४ कोटी ८० लाख
चंदगड १६८ ३० २ कोटी ४० लाख
गडहिंग्लज १०८ ४३ ३ कोटी ४४ लाख
गगनबावडा ४१ १० ८० लाख
हातकणंगले ६७ २० १ कोटी ६० लाख
कागल ९८ ४० ३ कोटी २० लाख
करवीर ११९ ४३ ३ कोटी ४४ लाख
पन्हाळा १०६ ५३ ४ कोटी २४ लाख
राधानगरी ११९ ६७ ५ कोटी ३६ लाख
शाहूवाडी १३८ २८ २ कोटी २४ लाख
शिरोळ ५३ १८ १ कोटी ४४ लाख
एकूण १२०५ ४३३ ३४ कोटी ६४ लाख
जिल्ह्यातील नवीन पाणी योजना ठरवून सौर उर्जेवर घेतल्या आहेत. नैसर्गिक स्त्रोतांचा वापर केल्याने लोकांची पैशाची बचत होणार आहे. हवे तेव्हा पाणी मिळणार आहे. जिल्हा परिषदेचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे कोट्यवधींची बचत होणार आहेच. जिल्ह्याचा हा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरल्याशिवाय राहणार नाही.
- संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी