
पीएम किसान नोंदणीसाठी कामकाज सुरु
पीएम किसान नोंदणीसाठी कामकाज सुरू
आजऱ्यात शेतकऱ्यांमधून समाधान; गाववार कॅम्पचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ ः पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदत्रे जमा करण्यासाठी गाववार कॅम्पचे आयोजन केले आहे. महसूल व कृषी विभागाच्या वतीने हे कॅम्प होत आहेत.
त्याचबरोबर गावनिहाय पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत डाटा दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अनेक दिवसांनंतर या योजनेचे काम सुरु झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. पी. एम. किसान सन्मान निधी महसूल व कृषी विभागाच्या वादात सुरू नव्हती. येथील कामकाज ठप्प होते. शेतकऱ्यांकडून याबाबत सातत्याने विचारणा होत होती. योजनेचे कामकाज सुरु करावे, अशी मागणी जनतेतून होत होती. जिल्हाधिकारी यांनी नुकताच आदेश दिल्यावर पूर्ववत काम सुरु झाले आहे.
कृषी विभाग, पंचायत समिती आणि महसूल यांनी एकत्रितपणे काम करण्यास सुरवात केली आहे. पूर्वी जसे गावांचे वाटप केले होते, त्या पध्दतीने काम करणार आहे. नवीन नोंदणीची मान्यता महसूल विभागाकडून केली जाणार आहे. दुरुस्तीची कामांची आवश्यक कागदपत्रे जमा करून ती कृषी विभाग, पंचायतीमार्फत महसूल विभागकडे दिली जातील. महसूल विभागाच्या लॉगिंगवरून हे कामकाज होईल. २०१७-१८ मध्ये ही योजना सुरु झाली. आजरा तालुक्यात सुमारे ३२ हजार ४०० लाभार्थी आहेत. मध्यंतरी या योजनेचे कामकाज सुरु नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत होती. याबाबत काही संघटनांनी आंदोलनही केले. कामकाज सुरु झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
---------------
गावनिहाय नोडल अधिकारी
चांदेवाडी-श्रीमती एम. डी. पाटील, देवर्डे- पी. डी. गुरव, कोरीवडे- पी. जी. पारपोलकर, पारेवाडी- एस. एस. कमते, पेंढारवाडी- एस. बी. गडकरी, महागोंड - जी. सी. बिक्कड, रेडेवाडी-पोश्रातवाडी- पी. टी. गावडे, गजरगाव- एस. डी. ऐनापुरे यांची नोडल अधिकारी या पदावर नियुक्ती केली आहे..