शिरोली

शिरोली

01736, 01737, 01739, 01740, 01742

संयमी आक्रमक नेतृत्व
---------------
राजाराम साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार अमल महाडिक यांची निवड झाली. विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत अमल महाडिक यांनी ‘राजाराम’चा किल्ला ताकदीने लढवत विजयाची ‘साखर’ वाटली. स्वतः आघाडीवर राहत नेतृत्व सिद्घ केल्यामुळे अध्यक्षपदी निवड ही केवळ औपचारिकताच होती. मंगळवारी (ता. ९) झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. अमल महाडिक यांचे अध्यक्षपदी विराजमान होणे ही महाडिक गटाला उभारी देणारी घटना आहेच. शिवाय त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातही नव्या समीकरणांची मांडणी होणार आहे.
- पी. एसकुमार, शिरोली पुलाची
--------------------------

कारकीर्दीचा श्रीगणेशा
शिरोली जिल्‍हा परिषद मतदारसंघ खुला नसल्याने २००७ च्या जिल्‍हा परिषद निवडणुकीत अमल महाडिक भादोले मतदारसंघातून कॉंग्रेसकडून रिंगणात उतरले. परिसर नवीन असूनही स्‍थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी विजश्री खेचून आणली आणि अमल महाडिक यांच्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा झाला. तत्पूर्वी ओम ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले होते. पण, विकासाचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी राजकारणात, प्रशासकीय निर्णयात सहभाग हवा, या हेतूने ते राजकीय आखाड्यात उतरले. आणि पुढची लढत ते लढले शिरोलीच्या घरच्या मैदानावर.

शिरोलीचे मैदान मारले
जिल्‍हा परिषदेच्या २०१२ च्या निवडणुकीत शिरोली जिल्‍हा परिषद मतदारसंघात त्यांनी शाहू स्वाभिमानी आघाडीसमोर शड्डू ठोकला. नवा व आश्‍वासक चेहरा, तरुणाईतील क्रेझ आणि ज्येष्ठांची साथ यामुळे अमल महाडिक यांनी हे मैदान मारले. अनेक विकासकामे त्यांनी सुरू केली. याची पोचपावती २०१५ च्या पुढे पोटनिवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरलेल्या शौमिका महाडिक यांच्या विजयाच्या रूपाने मिळाली. ९ हजार मतांनी महाडिक यांचा विजय झाला. २०१७ च्या निवडणुकीतही शौमिका महाडिक यांनी विजयाची पुनरावृत्ती केली.

‘दक्षिण’ विजय
कॉंग्रेसचे संख्याबळ असूनही जिल्‍हा परिषदेच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांना डावलले. याची सल महाडिक कुटुंबीयांच्या मनात होती. याचाच परिपाक म्हणून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक भाजपकडून कोल्हापूर दक्षिणच्या रणांगणात तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरूद्ध उभे ठाकले. अंतिम टप्प्यात घेतलेली उमेदवारी, प्रचार आणि राजकीय जोडण्यांसाठी कमी कालावधी मिळूनही सतेज पाटील यांचा पराभव करत अमल महाडिक जायंट किलर ठरले.

विकासकामे अधिक, प्रसिद्धी कमी
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या कार्यकाळात अमल महाडिक यांनी अनेक विकासकामे केली. मात्र, त्याची प्रसिद्धी केली नाही. गाजावाजा करण्यापेक्षा विकासकामे मार्गी लावण्याची त्यामागे त्यांची भूमिका होती. मात्र, या भूमिकेचा आणि ते ‘माध्‍यमस्नेही’ नसल्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसला.

‘राजाराम’मध्ये एंट्री
२०१५ मध्ये झालेल्या राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर ते प्रथमच संचालक झाले. मात्र, या निवडणुकीत महाडिक गटाचे मताधिक्य घटले होते. किंबहुना कारखान्याचे सत्ताकेंद्र शिरोलीतून बावड्याकडे जाता जाता थोडक्यात वाचले होते. यांची खंत अमल महाडिक यांना सातत्याने वाटत राहिली. यातूनच पुढील निवडणुकीत मताधिक्यासह दणदणीत विजय हे त्यांचे टार्गेट होते. ते त्यांनी साध्य केल्याचे नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले.

केडीसीसी संचालकपदी बिनविरोध
२०२२ मध्ये झालेल्या जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. पण, त्यात यश आले नाही. काही जागा बिनविरोध झाल्या. त्यात अमल महाडिक यांचा समावेश होता. दीर्घकाळ संचालक असलेल्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्वतःची उमेदवारी थांबवत अमल महाडिक महाडिक यांना संचालकपदी संधी दिली.

नेतृत्व केले सिद्घ
अमल महाडिक शांत स्वभावाचे आहेत, ते आक्रमक नाहीत अशी चर्चाही कायम होत राहिली. त्यात टीकेचाही सूर होता. राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीपर्यंत अपवाद वगळता त्यांनी विरोधकांच्या टीकेला कधी उत्तरही दिले नाही. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक यांनीच विरोधकांना उत्तर दिले. मात्र, ही निवडणूक अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखालीच लढली गेली आणि ती त्यांनी जिंकलीही. पायाला भिंगरी बांधून कार्यक्षेत्रातील १२२ गावांतील सभासंदाच्या गाठीभेटींपासून ते सभासदांच्या अपात्रतेच्या मुद्यावरील न्यायालयीन लढाईपर्यंत, प्रचारात विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यापासून ते त्यांच्याकडील बाजूंचे प्रश्‍न उपस्थित करणे, विरोधकांना आव्हान-प्रतिआव्हान देण्यापर्यंत अमल महाडिक यांनी संयत आक्रमकपणा दाखवत नेतृत्व सिद्ध केले. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक आदी सोबत असले तरी रणांगणाच्या आघाडीवर अमल महाडिकच राहिले. ही निवडणूक अमल महाडिक यांच्याभोवतीच केंद्रीत राहिल्यामुळे ते विजयाचे शिलेदार आणि शिल्पकार ठरले, यात शंका नाही.

अध्यक्षपदावर वर्णी
राजाराम साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक यांची निवड करत आमदार महादेवराव महाडिक यांनी कारखान्याची सूत्रे नव्या पिढीकडे सोपवली आहेत. कारखान्याच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला सिद्ध केले ते पाहता ही नवी जबाबदारीही ते सक्षमपणे पेलतील, असा विश्‍वास महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना आहे.

कुटुंबाची साथ
अमल महाडिक यांना वडील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. थोरले बंधू स्वरूप मडाडिक यांचे पडद्यामागील व्यवस्थापन उपयुक्त ठरत आले आहे. चुलत बंधू व खासदार धनंजय महाडिक यांचे खंबीर पाठबळ आणि पत्नी शौमिका महाडिक यांची साथ महत्त्वाची ठरली आहे.

शिरोली केंद्रस्थानाच्या दिशेने
महादेवराव महाडिक यांच्या राजकारणाची सुरवात शिरोलीतून झाली. शौमिका महाडिक यांच्या वाटचालीलाही शिरोलीतूनच बळ मिळाले. ‘राजाराम’मध्ये महादेवराव महाडिक, अमल महाडिक आणि माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या रूपाने शिरोलीचे तीन संचालक आहेत. गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अंतर्गत गटबाजीमुळे महाडिक गटाला शिरोलीतील सत्ता गमवावी लागली. गावातच झालेला पराभव महाडिक गटाला जिव्हारी लागला होता. त्यामुळे महाडिक यांच्या राजकीय प्रवेशाचे मूळ असलेल्या शिरोलीत सत्ता पुन्हा सत्ता मिळविणे हे महाडिक गटासाठी प्रतिष्ठेचे बनले होते. नोव्हेंबरमध्‍ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाडिक गटाला गेलेली सत्ता पुन्हा दणदणीत बहुमतासह मिळविण्यात यश आले. राजाराम कारखान्याच्या निवडणुकीतही शिरोलीतील मतदार बावड्याला साथ देणार नाहीत, याची पुरेपूर खबररदारी घेतल्याचे मतांवरून स्‍पष्ट होते.

चौकट
महाडिकांच्या वर्चस्वाची सद्दी
संपल्याची चर्चा आणि पुन्हा उभारी
२००९ मधील लोकसभा निवडणुकीत प्रमुख दावेदार असूनही खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली. २००९ च्याच विधानसभा निवडणुकीत नव्याने निर्माण झालेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आमदार सतेज पाटील यांच्‍यासमोर कडवे आव्हान निर्माण करूनही धनंजय महाडिक यांना पराभव स्वीकारावा लागला. पुढे महापालिका निवडणुकीत महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीची पिछेहाट झाली. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात महाडिकांच्या वर्चस्वाला उतरती कळा लागल्याची चर्चा रंगली. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा असतानाही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विजय मिळविला. पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपकडून अमल महाडिक विजयी झाले. २०१७ मध्ये झालेल्या जिल्‍हा परिषद निवडणुकीत शौमिका महाडिक शिरोली मतदारसंघातून विजयी झाल्याच. त्याचबरोबर जिल्‍हा परिषदेवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकवत अध्यक्षही झाल्या. जिल्ह्याच्या राजकारणात महाडिकांनी ‘कमबॅक’ केले. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव झाला. २०१९ च्याच विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांच्या पदरीही पराभव आला. २०२० मध्ये झालेल्या जिल्‍हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’च्या निवडणुकीत अनेक वर्षे सत्तेत असलेल्या महाडिकांच्या वर्चस्वाला धक्का लागला आणि पुन्हा महाडिकांच्या वर्चस्वाची सद्दी संपल्याची चर्चा सुरू झाली. पण, २०२२ मध्ये राज्यसभेच्या रिक्त जांगासाठी झालेल्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांनी विजयी पुनरागमन केले आणि राजाराम साखर कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीतही अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व जागा जिंकत ‘राजाराम’च्या गडावरील हुकमत सिद्ध केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com