पाऊस

पाऊस

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दमदार ‘वळीव’
कोल्हापूर, ता. ९ : जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशीही दमदार वळीव पावसाने हजेरी लावल्याने शेती आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यापासून समाधानकारक वळीव पाऊस हुलकावणी देत होता. काल आणि आज जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह झालेल्या वळीव पावसामुळे पिकांना उभारी मिळाली आहे.
राज्यात यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, एप्रिल ते मे महिन्या दरम्यान जिल्ह्यात दमदार वळीव पावसाची गरज असते. हा पाऊस पिकांना पोषक ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहिले. दुपारनंतर उष्मा वाढू लागला. सायंकाळी जोरदार वाऱ्यासोबत पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बघता-बघता शहरातील रस्त्यांवर पाणी वाहत राहिले. जिल्ह्यात इतर ठिकाणीही जोरदार पाऊस झाला आहे.

chd93.jpg
चंदगड ः शहरात वळीव पावसाने दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली.

चंदगडला मेघगर्जनेसह पाऊस
चंदगड ः शहर परिसरात आज दुसऱ्या दिवशीही वळवाने हजेरी लावली. दुपारी बाराच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरवात झाली. सुमारे पाऊण तास पाऊस झाला. चंदगडसह हिंडगाव, फाटकवाडी, इब्राहीमपूर, गवसे, पुंद्रा, कानूर, कोकरे, अडुरे परिसरातही पाऊस झाला. सलग दोन दिवस झालेल्या पावसाचा ऊस, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला पिकांसाठी उपयोग होणार आहे.
-
म्हाकवे परिसराला झोडपले
म्हाकवे: म्हाकवेसह परिसराला आज जोरदार वळीव पावसाने झोडपून काढले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. वाढत्या उन्हामुळे पाण्याचा ताण पडणाऱ्या ऊस पिकासह इतर पिकांना या पावसाचा फायदा होणार आहे, मात्र वीट व्यावसायिकांचे अचानक आलेल्या पावसामुळे नुकसान झाले. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची व नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर चिमुकल्यांनी भिजण्याचा आनंद घेतला.
-
कोडोलीत व्यापाऱ्यांची तारांबळ
कोडोली : परिसराला मंगळवारी सहाच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने झोडपले. कोणताही अनर्थ होऊ नये म्हणून महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला होता तर अचानक आलेल्या पावसाने व्यापाऱ्यांची व वीटभट्टी व्यावसायिकांची तारांबळ उडाली. गेले काही दिवस वातावरणात चांगलीच उष्णता जाणवत होती. दुपारी सहाच्या सुमारास अचानक अंधारून येऊन पडलेल्या पावसाने वातावरणात आल्हाददायक झाले. हा पाऊस मशागतीसाठी उपयुक्त आहे.
-
सिद्धनेर्लीत घरात पावसाचे पाणी
सिद्धनेर्ली ः सिद्धनेर्लीसह परिसरात आज सलग दुसऱ्या दिवशी ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार वळीव पावसाने हजेरी लावली. सिद्धनेर्लीमधील वडगाव परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर शिवतळे परिसरातील दहा ते बारा घरांत पावसाचे पाणी घुसून प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. यामध्ये उदय पाटील, एस. टी. पाटील, रामा पाटील, अक्षय पाटील, गणू पाटील आदींच्या घरात पाणी घुसले.
-
आसुर्ल-पोर्लेत शेतकऱ्यांना दिलासा
पोर्ले तर्फ ठाणे ः आसुर्ल-पोर्ले परिसरात आज सायंकाळी सव्वासहा वाजता सुमारे पाऊन तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. परिसरात गावाच्या उत्तरेकडील शेतीला पाणीटंचाईची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
-
शिरटीत झाडे उमळून पडली
शिरोळ ः शिरोळ आणि परिसरात वादळी वाऱ्यास पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.
शिरोळ, घालवाड, कुटवाड, कनवाड शिरटी आदी परिसरात सायंकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. शिरटीमध्ये वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.
-
बोरपाडळे परिसरात वळवाची हुलकावणी
बोरपाडळे : बोरपाडळेसह मोहरे, शहापूर, काखे, मिठारवाडी आदी परिसराला वळीव पावसाची हुलकावणी सुरू आहे. दररोज केवळ विजांचा कडकडाट अन्‌ ढगांचा गडगडाट ऐकणेच शेतकऱ्यांच्या नशिबी आहे. बळीराजा चांगल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
-
धामोडला वीटभट्टी मालकांची तारांबळ
धामोड : येथील परिसराला विजेच्या कडकडाटासह तासभर वळीव पाऊस झाला. सायंकाळी सात वाजता पावसाने सुरवात केली. उस पिकासाठी पाऊस पोषक ठरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. वीटभट्टी मालकांची तारांबळ उडाली. धामोडसह आपटाळ कोनोली, म्हासुर्ली, गवशी, जोगमवाडी, कोते, चांदे येथे पाऊस झाला.
-
पडळला झाड कोसळून वीज खंडित
माजगाव ःमाजगाव, पडळ, यवलूज, शिंदेवाडी आदी परिसरात मंगळवारी सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने झोडपले. जोरदार वाऱ्यामुळे माजगाव येथील बी. टी.चौगले यांच्या जनावरांच्या शेडवरील पत्रे उडून आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पडळ येथे वीज तारेवर झाड कोसळून वीजपुरवठा खंडित झाला.
-
गडहिंग्लज परिसरात मुसळधार
गडहिंग्लज : शहर आणि परिसरात आज रात्री साडेसातच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी सातच्या सुमारास वारे आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर पावसाला प्रारंभ झाला. अर्धा तास पाऊस पडला. दरम्यान, सोमवारी रात्री आणि आज पहाटेसुद्धा वळीव पाऊस झाला. मात्र, तो तुरळक होता. आजच्या रात्रीचा पाऊस जोरदार झाला. हा पाऊस ऊस पिकाला उपयुक्त ठरला. आजपासून तालुक्यातील बेळगुंदीची महालक्ष्मी यात्रा सुरु झाली. वळीव पावसाने यात्रेच्या तयारीत व्यत्यय आला.
-
करवीर पश्चिम परिसरात जोर
कुडित्रे ः करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले.
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा ते कळेपर्यंत रुंदीकरणाच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरमावर माती टाकल्याने चिखलच चिखल झाला. यामुळे दुचाकी वाहनचालकांची कसरत झाली.
बालिंगा, कुडित्रे, सांगरुळ परिसरात सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
बालिंगा येथे दुसऱ्या दिवशी मोरीचे ठिकाणी चिखल झाला. त्यामुळे वाहने घसरू लागली. पुढे सांगरुळ फाटा व कोपार्डे येथे मोरीच्या ठिकाणी चिखल होऊन निसरडी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com