इचल : श्रीराम पवार सर व्याख्यान

इचल : श्रीराम पवार सर व्याख्यान

ich910.jpg 01796
इचलकरंजी ः समाजवादी प्रबोधिनी येथे आयोजित व्याख्यानात बोलताना ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार. मंचावर प्रसाद कुलकर्णी, अशोक चौसाळकर, दशरथ पारेकर आदी.
(पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)

भारताच्या संकल्पनेसमोर बहुसंख्याकवादाचे आव्हान
श्रीराम पवार ः इचलकरंजीत समाजवादी प्रबोधिनीतर्फे वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान

इचलकरंजी, ता. ९ ः भारताच्या संकल्पनेसमोर बहुसंख्याक वादाचे सध्या मोठे आव्हान निर्माण झाले आहे, असे मत सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले. येथील समाजवादी प्रबोधिनीच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘भारताची संकल्पना’ या विषयावर जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर होते.
इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी पाहुण्यांचे शाल, ग्रंथ व पुष्प देऊन स्वागत केले. सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात प्रबोधिनीच्या वाटचालीचा आढावा घेतला. ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांना सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री. पवार म्हणाले, ‘स्वातंत्र्यानंतर भारताने धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता, सहिष्णुता, एकात्मता या मूलभूत गोष्टींचा स्वीकार केला; पण त्याला विसंगत अशी उजवी विचारसरणी होती. नव्वदच्या दशकानंतर भारताच्या मूळ संकल्पनेला छेद देण्याचे काम सुरू झाले. मंडल-कमंडल वादात भारताच्या संकल्पनेला तडे गेले. धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांची खिल्ली उडवली गेली. त्यानंतर धर्मराष्ट्र हा पर्याय दिला गेला. जातीच्या आधारावर राजकारणास सुरुवात झाली. जाती-धर्माच्या आधारावर निवडणुका होताना दिसू लागल्या. भारताची मूळ संकल्पना बाजूला पडून पर्यायी संकल्पना समाजात रुजत आहे. त्याचे चित्र अलीकडील चित्रपटातूनही स्पष्ट होत आहे.’
ते म्हणाले, ‘आम्ही सर्व एक आहोत, या आधारावर देश बनला आहे; पण या तत्त्वाला नख लावण्याचे काम बहुसंख्याकवाद करीत आहे. मुळात धर्मावर आधारित राजकारण हे नेहमीच मूठभरांचे हितसंबंध जपणारे असते. मुस्लिम व हिंदू दोन्ही मूलतत्त्ववादी धोकादायक असतात. सध्या बहुसंख्याक राजकारणातून दोन धर्मांमध्ये भिंत घालण्याचे काम सुरू आहे. केवळ राजकारणापुरतेच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांत असे चित्र दिसत आहे. त्याचे मोठे आव्हान आपणास भविष्यात पहावयास मिळणार आहे. आपण अशा वळणावर आहोत की पुढे देश कोठे घेऊन जाणार आहोत हे आताच ठरविण्याची गरज आहे. अशावेळी सर्वसमावेशकतेला बळ देण्याची गरज आहे.
डॉ. चौसाळकर म्हणाले, ‘फोडा व राज्य करा, या इंग्रजांच्या धोरणाचा वापर आजचे राजकर्ते करीत आहेत. एका विशिष्ट समुदायाला निर्णय प्रक्रियेतून वगळले जात आहे. त्यांना निवडणुकीत उमेदवारी दिली जात नाही. लोकशाहीसाठी ही मोठी धोकादायक बाब आहे. सध्याचे राजकर्ते हे सांस्कृतिकदृष्ट्या अडाणी आहेत. इतिहास आणि विज्ञानात बदल करून पुढील पिढीचे नुकसान करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. उद्याच्या भारतातील समाजावर त्याचे वाईट परिणाम होणार आहेत. धर्मवादी प्रभावी ठरतात, त्यावेळी देशाची हानी होते. त्यामुळे धर्मनिरपेक्ष, सर्व समावेशकता असलेली भारताची संकल्पना टिकवणे, ही आपली जबाबदारी आहे.’
व्याख्यानास श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अन्वर पटेल यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com