मोफत प्रवेशाला थंडा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत प्रवेशाला थंडा प्रतिसाद
मोफत प्रवेशाला थंडा प्रतिसाद

मोफत प्रवेशाला थंडा प्रतिसाद

sakal_logo
By

मोफत प्रवेशाला थंडा प्रतिसाद
‘आरटीई’च्या अद्याप ३५ जागा रिक्त; प्रवेशाची मुदत सोमवारपर्यंत वाढवली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळांत २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. पण, त्याला गडहिंग्लज तालुक्यातील पालकांचा थंडा प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे. अद्याप ३५ जागा रिक्त आहेत. दरम्यान, कमी अधिक प्रमाणात सर्वत्रच अशी परिस्थिती असल्याचे निदर्शनास आल्यामुळे शिक्षण विभागानेही प्रवेशासाठी सोमवारपर्यंत (ता.१५) मुदत वाढवली आहे.
इंग्रजी माध्यमाच्या खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळांना आरटीई अधिनियमानुसार प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देणे बंधनकारक आहे. यातून पहिलीच्या वर्गासाठी प्रवेश मिळतो. तीन वर्षांच्या पटावरुन मोफत प्रवेशासाठी शाळेचा कोटा ठरवला आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित (खुला प्रवर्ग सोडून सर्व) घटकातील विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश घेता येतो. या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षणाचे शुल्क माफ होते. पण, शाळेकडून पुरवल्या जाणाऱ्या शैक्षणिक साहित्यासह प्रवास खर्च द्यावा लागतो.
गडहिंग्लज तालुक्यात २० खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळा आहेत. या शाळांचा आरटीईचा कोटा १४१ इतका आहे. यातील दोन जागा रद्द केल्या आहेत. आरटीई अंतर्गत प्रवेशाची ८ मे अखेरची मुदत होती. या कालावधीत १०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सहा शाळांतील प्रवेश फुल्ल झाला आहे. १४ शाळांतील ३५ जागा रिक्त आहेत. गडहिंग्लज तालुक्यातच नव्हे तर अन्यत्रही कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आरटीई अंतर्गत प्रवेशाची मुदत वाढवली आहे. पालकांना आता सोमवारपर्यंत (ता.१५) आपल्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करता येणार आहेत.
--------------
..म्हणून प्रवेशाकडे कानाडोळा
आरटीई प्रवेशाबाबत पालक अज्ञानी असणे हे एक महत्वाचे कारण पुढे येत आहे. याशिवाय आटीई प्रवेशाची प्रक्रिया जानेवारी-फेब्रुवारीपासूनच करावी लागते. ऑनलाईन अर्ज भरणे आणि आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे त्रासदायक वाटते. त्यामुळेही पालक आरटीई प्रवेशाकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.
------------
दृष्टीक्षेपात आरटीई प्रवेश
किलबिल गडहिंग्लज, रचना भडगाव, बी. आर. चव्हाण चन्नेकुपी, हलकर्णी भाग हलकर्णी, प्रोग्रेसिव्ह, सेंट झेवियर्स या सहा शाळांतील प्रवेश फुल्ल झाले आहेत. तर न्यू होराईझन (१०), क्रिएटीव्ह (२), केदारी रेडेकर (१), साई इंटरनॅशनल (६), सर्वोदय (३), साधना गडहिंग्लज (१), साधना भडगाव (१), दीप दुंडगे (१), हिरण्यकेशी (१), धोंडिराम पताडे महागाव (२), एस. एस. नेसरी (१), राधाकृष्ण (१), किलबिल इंग्लिश मेडीयम (३), विश्वनाथ गडहिंग्लज (२) या शाळांतील एकूण ३५ जागा अद्याप रिक्त आहेत.