
सौर उर्जा, नैसर्गिक उताराचा सुंदर वापर
(भाग २)
01991
....
सौर उर्जा, नैसर्गिक उताराचा सुंदर वापर
''मधलावाड्या''ची पाण्यासाठीची फरपट थांबलीः वस्तीमधील घरांना गुरुत्वाकर्षण प्रणालीने विनाखर्चाने पाणी
सदानंद पाटील, सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर,ता.१०:जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्यात राधानगरी तालुक्यातील धरणांचा मोठा वाटा आहे. या पाण्यावर धरणे उभी राहिली, तेथील पाण्यावर हजारो एकर शेती सिंचनाखाली आली आहे. तसेच शेकडो गावे आणि लाखो लोकांची तहान भागवण्याचे काम ही धरणे करत आहेत. मात्र याच तालुक्यातील दुर्गम वाड्या, वस्त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. यावर पर्याय म्हणून पाणी पुरवठा विभागाने सौर उर्जा आणि गुरुत्वाकर्षण प्रणाली अर्थात ग्रॅविटीचा वापर करुन अनेक वाड्यांच्या पाणी टंचाईवर मार्ग काढला आहे. यापैकीच एक आहे म्हासुर्ले येथील मधलावाडा ....
...
कोल्हापूरपासून अंदाजे ४५ कि.मी. अंतरावर मौजे म्हासुर्ले हे गाव आहे. या गावाला चार, पाच वाड्या आहेत. त्या गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या दिशांना विभागल्या गेल्या आहेत. या वाड्यांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात तर या ठिकाणी जाणे महाकठिण. अर्धवट कच्चे रस्ते पार करत गेल्यानंतर काही अंतराने पुढे रस्ताच सापडत नाही. या ठिकाणी रस्ते शोधण्याचीच वेळ येते. नव्याने येणारी व्यक्ती अर्ध्या वाटेवरुन परत फिरण्याचीच शक्यता जास्त. या सर्व वाड्यांपैकी मधला धनगरवाड्याची लोकसंख्या अवघी ५० ते ६० इतकी आहे. पूर्वी झऱ्यावरून व विहिरीवरून पाणी पुरवठा केला जात होता. परंतु टंचाईच्या काळात हे पाणी कमी झाले. त्यामुळे नव्याने विंधन विहिर खोदाई करण्यात आली.
विंधन विहिर खोदल्यानंतर त्यातील पाणी उपसण्याचा प्रश्न आला. लोकांना झिरो मेन्टेनन्स असणारी योजना हवी होती. अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांना देखभाल दुरुस्ती खर्च परवडणे शक्य नव्हते. त्यामुळे या हातपंपावर सौर उर्जेवर आधारित दुहेरीपंप लघु नळ पाणी पुरवठा योजना उभारण्यात आली. याला भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेनेही मान्यता दिली. त्यामुळे या योजनेचे पुढील सोपस्कर पार पडले. विंधन विहिरीमधील पाणी सौर पंपाद्वारे पाणी उपसा करून लोखंडी मनोऱ्यावर ठेवलेल्या ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीमध्ये साठवण्यात आले. टाकी उंचावर असल्याने वाडी, वस्तीमधील घरांना गुरुत्वाकर्षण प्रणालीने, विनाखर्चाने हे पाणी पुरवले जात आहे. हेच या योजनेचे वैशिष्ट्य असू्न आज मधलावाडा पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाल्याचे पहायला मिळत आहे.
...
कोट
‘जाणीवपूर्वक जास्तीत जास्त वाड्या, वस्त्यांसाठी सौर उर्जेचा वापर करुन पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले. डोंगर वाटेतून मार्ग काढत विंधन विहिर घेतली. यावरच सौर पंप बसवला. विजेचा खर्च वाडीवरील लोकांना परवडणारा नाही. त्यामुळेच गुरुत्व पध्दतीने पाणी पाण्याच्या टाकीत आणण्यात आले. आज लोकांना हवे तेव्हा पिण्याचे पाणी विना खर्चात उपलब्ध होत आहे.
अमित ओतारी, उपअभियंता, यांत्रिकी