
कर्नाटक निवडणुकीत ८८ लाख रोकड जप्त ः विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी
साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त
कर्नाटक निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिस दलाची कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना आमिष दाखवण्यासाठी वापरली जाणारी रोख रक्कम, दारू, गांजा असा सुमारे चार कोटी ३५ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यामध्ये ८८ लाखांची रोकड तसेच वाहने, शस्त्रे यांचा समावेश आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमांवर २४ एप्रिल ते ८ मे या दरम्यान ही कारवाई झाली, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज पत्रकाद्वारे दिली आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमाभागातील गावांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सूक्ष्म नियोजन करून बंदोबस्त लावला होता. याशिवाय दोन्ही राज्यांतील पोलिसांनी परस्पर समन्वय ठेवून ठिकठिकाणी कारवाई केली. निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोकड, दारू, गांजा आणण्यात आला होता; मात्र पोलिसांनी कारवाई करून तो जप्त केला. यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राकडून कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर ग्रामीण येथील सीमाभागात ४० तपासणी नाके सुरू केले होते. या नाक्यांवर २४ तास पोलिसांचा जागता पहारा होता. त्यातून सुमारे चार कोटी ३५ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अंमली पदार्थांच्या तस्करीसह मटका, जुगार अशा गुन्ह्यांमधील संशयित आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकणाऱ्या २८९० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यातील ४० तपासणी नाक्यांवर एकूण दीडशे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी तैनात होते.
जप्त मुद्देमाल
मुद्दमाल किंमत
रोख रक्कम ८८ लाख
३५ हजार लिटर दारू २० लाख
१९ किलो गांजा २ लाख ३३ हजार
११ वाहने -
----------------------------------------------------------