महाराष्ट्रातील ‘सीटीईटी’च्या उमेदवारांची अन्य राज्यांत धाव

महाराष्ट्रातील ‘सीटीईटी’च्या उमेदवारांची अन्य राज्यांत धाव

०००००००००००००००००००००००००

‘सीटीईटी’उमेदवारांची अन्य राज्यांत धाव
महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे फुल्ल; संख्या वाढविण्याची आग्रही मागणी

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१० ः केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (सीटीईटी) अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यात सुरूवातीच्या सात दिवसांमध्येच महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रांची असलेली ४० हजार ८५० इतकी उमेदवार क्षमता फुल्ल झाली आहे. त्यामुळे आता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी अन्य राज्यांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. अन्य काही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे फारच कमी आहेत. या ठिकाणी केंद्रांची संख्या वाढविण्याची आग्रही मागणी उमेदवारांनी केली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) जुलै- ऑगस्टदरम्यान होऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी २७ एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. गेल्यावर्षी देखील महाराष्ट्रातील केंद्रांची संख्या कमी असल्याने अनेक उमेदवारांना अर्ज करता आला नव्हता. त्यामुळे यंदा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी घाई केली आणि अवघ्या आठवड्याभरात म्हणजेच तीन मेपर्यंत केंद्रांची क्षमता फुल्ल झाली. अर्ज करण्याची मुदत २७ मेपर्यंत आहे; मात्र, महाराष्ट्रातील केंद्रे फुल्ल झाल्याने काही उमेदवारांनी बेळगाव, हुबळी, बिदर, कलबुर्गी, वापी, हैदराबाद, तिरूपती आदी केंद्राची निवड केली; पण, त्यांची देखील आता क्षमता संपत आली आहे. सीटीईटी देणारे बहुतांश उमेदवार सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्यांना अन्य राज्यात जाऊन परीक्षा देणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सीटीईटीच्या केंद्रांची संख्या केंद्र शासनाने तातडीने वाढवून दिलासा देण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.

सध्या महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र उपलब्ध नसल्याने आम्हा विद्यार्थी उमेदवारांना इतर राज्य निवडावे लागत आहे. या सीटीईटीसाठी एक हजार रूपये शुल्क भरून पुन्हा परीक्षेसाठी दुसऱ्या राज्यात जावे लागत असेल, तर ती एकप्रकारे विद्यार्थ्यांची लूट आहे. केंद्र शासनाने सीटीईटीसाठी महाराष्ट्रात परीक्षा केंद्रे वाढवून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी.
-जावेद तांबोळी, विद्यार्थी

‘महाराष्ट्रातील उमेदवारांना अन्य राज्यांतील केंद्रांवर सीटीईटी परीक्षा देणे सोयीस्कर ठरणारे नाही. त्यामुळे महाराष्ट्रातून अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांच्या जवळच्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे.
-राम करे, सहसचिव, ऑल इंडिया यूथ फेडरेशन


देशभरातील काही ‘सीटीईटी’च्या केंद्रांची स्थिती
राज्य *एकूण क्षमता* दाखल झालेले अर्ज* शिल्लक जागा
महाराष्ट्र*४०८५०*४०८५०*०
उत्तरप्रदेश *४३१७४६* ३८४०९४*४६८४२
दिल्ली* २२३०२३*३७५७५*१८५४४८
बिहार*२१२२१२*१७२८८९*३९३२३
राजस्था*१४८१४९*१९२०७*१२८९४२
मध्यप्रदेश*११०३८६*२६३५८*८४०२८
उत्तराखंड*४६०४६*१४७८०*३१२६६


अधिक कल का?
सीटीईटी परीक्षेत पात्र ठरणारे उमेदवार देशभरातील कोणत्याही राज्यांतील शिक्षकपदाच्या नोकरीसाठी पात्र ठरतात. शिवाय या परीक्षेची काठीण्य पातळी टीईटी परीक्षेच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे सीटीईटी परीक्षा देण्याकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे.

लखनौ, जयपूरपेक्षा महाराष्ट्राची क्षमता कमी
लखनौ (९६,०४६), जयपूर (८९,८९०), भोपाळ (५१,०५१) या शहर आणि उत्तराखंड (४६,०४६) या राज्यातील परीक्षा केंद्रांच्या क्षमतेपेक्षा महाराष्ट्रातील केंद्रांची क्षमता कमी आहे. ही क्षमता यंदा वाढली नाही, तर राज्यातील अनेक उमेदवार परीक्षेला मुकणार आहेत. त्यात विद्यार्थीनींची संख्या अधिक असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com