
‘आयटीआय’ घेणार छत्रपती शाहू महाराज करिअर मेळावे
‘आयटीआय’ चे उद्यापासून करिअर मेळावे
राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त उपक्रम; जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत आयोजन
कोल्हापूर, ता. १० ः व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राज्यभर छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळावे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) माध्यमातून घेण्याचे नियोजन केले आहे. या संचालनालयाच्या सूचनेनुसार कळंबा रोड येथील ‘आयटीआय’तर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये शुक्रवार (ता. १२) पासून ६ जूनपर्यंत सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत मेळावे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘आयटीआय’चे प्राचार्य महेश आवटे, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी वाय. बी. पाटील आणि कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्यामध्ये इयत्ता दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये दहावी-बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यास प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि कर्ज योजना माहिती दिली जाणार आहे. करिअर प्रदर्शनीच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम, करिअरच्या वाटा यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. पहिला मेळावा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा शुक्रवारी (ता. १२) कळंबा येथील अमृतसिध्दी सांस्कृतिक भवनमध्ये होणार आहे. इचलकरंजीत ५ जून रोजी मेळावा होईल, असे प्राचार्य आवटे यांनी सांगितले. यावेळी ‘आयटीआय’च्या उपप्राचार्या एम.डी. जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
........
विधानसभा मतदारसंघ* तारीख* स्थळ
कोल्हापूर उत्तर* १९ मे* केशवराव भोसले नाट्यगृह
करवीर *२३ मे* स्वामी समर्थ मंगल कार्यालय, सांगरुळ
चंदगड * १८ मे* सोयरिक मंगल कार्यालय कॉलेज रोड, चंदगड
राधानगरी* २२ मे *अशोका मल्टीपर्पज हॉल, कोल्हापूर रोड, गारगोटी
कागल* २६ मे* दत्तप्रसाद हॉल, मुरगूड नाका, मुरगूड
शाहूवाडी * २५ मे* शुभारंभ हॉल, मलकापूर
हातकणंगले * १ जून *संजय घोडावत इन्टिट्यूट सेमिनार हॉल, अतिग्रे
शिरोळ *६ जून * यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर