
फुटबॉल
फोटो : ०२०१२
2012
कोल्हापूर : शाहू छत्रपती गोल्ड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये संयुक्त जुना बुधवार विरुद्ध दिलबहार यांच्या सामन्यातील एक क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
संयुक्त जुना बुधवार मुख्य फेरीत दाखल
दिलबहारवर १-० अशी मात; मुख्य फेरीचे सामने उद्यापासून
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : शाहू छत्रपती गोल्ड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत आज संयुक्त जुना बुधवार तालीमने बलाढ्य दिलबहारला १-० ने पराभूत करून मुख्य फेरीत प्रवेश केला. स्थानिक शिवाजी तरुण मंडळ, बालगोपाल, पाटाकडील आणि संयुक्त जुना बुधवार मुख्य फेरीत समाविष्ट आहेत. या संघांना मोहामेडन स्पोर्टिंग (कोलकत्ता), डेम्पो स्पोर्टस् (गोवा), केरळ इलेक्ट्रिसिटी बोर्ड (केरळ), रूट्स फुटबॉल क्लब (बंगळूर) यांच्याविरुद्ध मुख्य फेरीत लढत द्यावी लागणार आहे. मुख्य फेरीतील पहिला सामना बालगोपाल विरुद्ध डेम्पो स्पोर्टस् (गोवा) यांच्यात शुक्रवारी (ता. १२) आहे.
येथील राजर्षी शाहू स्टेडियमवरील स्पर्धेत दिलबहार आणि संयुक्त जुना बुधवार यांच्यात लढत झाली. दोन्ही संघांसाठी सामना जिंकणे प्रतिष्ठेचे होते. जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरलेल्या खेळाडूंनी पहिल्या मिनिटापासूनच वेगवान खेळ करत चढाया केल्या. दोन्ही संघांनी बचावात्मक व्यूहरचना केली होती. पूर्वार्धामध्ये दोन्ही संघांच्या आघाडीच्या खेळाडूंना गोल करण्यात यश आले नाही. दिलबहारचे खेळाडू व्हॅलेंटाईन, सतीश साळुंखे, राहुल तळेकर, स्वयंम साळुंखे, सुशांत अतिग्रे यांनी सुसंगत खेळ करत आक्रमक चढाया केल्या. जुना बुधवारच्या रविराज भोसले, ब्रोसेन, स्वप्नील तेलवेकर, सचिन मोरे, प्रकाश संकपाळ, आकाश मोरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पूर्वार्धामध्ये जुना बुधवारच्या अभिषेक भोपळे याला गोल करण्याची मिळालेली संधी वाया गेली.
उत्तरार्धामध्ये दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरले. ४९ व्या मिनिटाला संयुक्त जुना बुधवारच्या प्रथमेश लोखंडेच्या पासवर रविराज भोसले याने हेडद्वारे शानदार गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर दिलबहार संघाने गोलची परतफेड करण्यासाठी आक्रमक चढाई केल्या. दिलबहारच्या वेलेंटाईन याच्या पासवर पवन माळी याने हेडद्वारे मारलेला चेंडू गोलपोस्टला लागून बाहेर गेला. सामना संपण्यास काही मिनिटांचा अवधी असताना दिलबहारला जुना बुधवारच्या डी बाहेर मिळालेला फ्री किकची संधी मिळाली. परंतु जुना बुधवारच्या बचाव फळीमुळे दिलबहारला लाभ घेता आला नाही. निर्धारित वेळेत संयुक्त जुना बुधवारने सामना १-० असा जिंकत मुख्य फेरीत प्रवेश केला.
मुख्य फेरीतील सामने
शुक्रवार (ता. १२) - डेम्पो गोवा विरुद्ध बालगोपाल
शनिवार (ता. १३) - मोहमेडन एससी विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ
रविवार (ता. १४)- केएसईबी केरळ विरुद्ध पाटाकडील
सोमवार (ता. १५)- रुट्स क्लब बंगळुरू विरुद्ध जुना बुधवार