‘गैरमार्ग’ प्रकरणी दहावी, बारावीच्या २२ विद्यार्थ्यांची चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गैरमार्ग’ प्रकरणी दहावी, बारावीच्या २२ विद्यार्थ्यांची चौकशी
‘गैरमार्ग’ प्रकरणी दहावी, बारावीच्या २२ विद्यार्थ्यांची चौकशी

‘गैरमार्ग’ प्रकरणी दहावी, बारावीच्या २२ विद्यार्थ्यांची चौकशी

sakal_logo
By

दहावी, बारावीच्या २२ विद्यार्थ्यांची चौकशी

गैरमार्गांचा वापरः बोर्डाच्या नियमानुसार कारवाई होणार

कोल्हापूर, ता. १० ः स्वतःची ओळख पटेल या उद्देशाने उत्तरपत्रिकांमध्ये उल्लेख करणे, उत्तरपत्रिकांचे पान फाडणे, अशा गैरमार्गांचा अवलंब केलेल्या दहावी, बारावीच्या एकूण २२ विद्यार्थ्यांची चौकशी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केली आहे. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर मंडळाच्या नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
उत्तरपत्रिकांची तपासणी करणाऱ्या शिक्षकांना स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी त्यामध्ये नाव, संपर्क क्रमांक अथवा माझ्या घरची परिस्थिती बेताची असून मला पास करा, आदी स्वरूपातील संदेशांचा काही विद्यार्थी उत्तरपत्रिकांमध्ये उल्लेख करतात. उत्तरपत्रिकांची पाने फाडतात. पेपर लिहिताना वापरलेल्या पेनच्या शाईमुळे हस्ताक्षरांमध्ये बदल दिसून येतात. अशा स्वरूपातील काही प्रकार कोल्हापूर विभागातील दहावीच्या १४, तर बारावीच्या ८ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये निदर्शनास आले. त्यावर कोल्हापूर विभागीय मंडळाने चौकशी अधिकारी नियुक्ती या प्रकरणांची चौकशी केली. त्याचा अहवाल राज्य शिक्षण मंडळाला सादर केला. परीक्षेत अशा पद्धतीने गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षण मंडळाच्या समितीने चौकशी पूर्ण केली आहे. त्यांच्या नियमानुसार कारवाई होईल, असे कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव डी. एस. पोवार यांनी बुधवारी सांगितले.