
मनसे आंदोलन
12796
कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी मीरा चौगले यांना निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी
आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर मनसेचे आंदोलन
कोल्हापूर : शासनाच्या कसबा बावडा येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रूग्णालयात कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अठ्ठावीस महिने घरात बसून शासनाचे वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करा, अशी मागणी करण्यात आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपसंचालक कार्यालयात यापूर्वी आंदोलन केले होते. त्या वेळी रूग्णालयातील ३७ कर्मचाऱ्यांना काम न करताच वेतन देण्यात आल्याचे आरोग्य उपंचालकांना सांगण्यात आले होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. आरोग्य उपसंचालकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते आज पुन्हा कार्यालयात गेले. त्यांनी ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. आरोग्य उपसंचालक प्रेमचंद कांबळे यांना कार्यालयात येणार असल्याची कल्पना देऊनही ते उपस्थित न राहिल्याने कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कार्यालयाबाहेर कार्यकर्ते बसून राहिल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर मुख्य प्रशासकीय अधिकारी मीरा चौगले यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. चौगले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात नयन गायकवाड, राजू जाधव, मोहन शेळके, संजय पाटील, तुषार चिकुर्डेकर, अमर बचाटे, विशाल मोरे सहभागी झाले होते.