
आज पासून पाणीपुरवठा सुरळीत
शहरात आजपासून
पाणीपुरवठा सुरळीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः चंबुखडी टाकीपासून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे शहरातील काही भागांत दोन दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. मात्र, हे काम पूर्ण झाल्याने आजपासून शहरातील सर्व भागांत पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. ११) ज्या भागात पाणी आले नाही. अशा सर्व २१ ठिकाणी सहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला, अशी माहिती प्रशासनाने दिली.
शहरातील जलवाहिन्यांची गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. चंबुखडी येथील टाकीच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह आणि रंकाळा टॉवर जवळील जलवाहिनीची गळती काढण्याचे काम सुरू होते. यातील व्हॉल्व्हचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे शहरातील सी, ए आणि बी वॉर्ड येथे पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने होईल. तसेत शहरातील सर्वच भागात पाणीपुरवठा सुरळीत असले. ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही तेथे महापालिका प्रशासनातर्फे टँकरने पाणीपुरवठा केला जातो. आज २१ ठिकाणी सहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.