
बेकायदेशीर सावकरी
अवैध सावकारी करणाऱ्या चार जणांवर छापे
---
घराला ठोकले टाळे; जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची कारवाई
कोल्हापूर, ता. ११ : अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या चार जणांविरुद्घ जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे छापा टाकून कारवाई करण्यात आली. यात रणजित भिकू भोसले (रा. बेघर वसाहत, यड्राव, ता. शिरोळ), सुकुमार आप्पासो पाटील (रा. कोरोची, ता. हातकणंगले), सुभाष खुशालचंद मालपाणी (रा. मातोश्री दत्त कॉलनी, सांगली रोड, इचलकरंजी, ता. हातकणंगले) आणि प्रमोद अशोक धुमाळ (रा. दुर्गामाता मंदिरजवळ, ए वॉर्ड, लक्षतीर्थ वसाहत) अशा चार सावकारांविरुद्ध कारवाई केली आहे. यात सुभाष मालपाणी याच्या घराला टाळे ठोकून घरातून धनादेश, व्यवहार नोंदी असलेली वही, घर खरेदी दस्तसाठी घेतलेला १०० रुपयांचा स्टॅप, करारपत्रे, स्टॅम्प पेपरवरील संचकार पत्र, भिशी नोंद असलेली वही, जमीन खरेदी दस्त जप्त केले आहेत. जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
खासगी सावकरीविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार खासगी सावकारांच्या घरी जाऊन झडतीची कारवाई केली. सहकार विभागातील तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पथकांनी ही कारवाई पूर्ण केली. यासाठी सहकार विभागाचे दोन अधिकारी व १६ कर्मचारी अशा १८ कर्मचाऱ्यांची, पोलिस अधिकारी व आठ पोलिस कॉन्स्टेबल यांची नियुक्ती केली होती. झडतीत अवैध सावकारीचे दस्तऐवज, करारपत्रे यांच्या चौकशीचे काम सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात अवैध सावकारी करणाऱ्यांबद्दल आणि आर्थिक पिळवणुकविरुद्ध तक्रार दाखल करावी, असे आवाहन करे यांनी केले.