कामाआधीच निधी वाटप

कामाआधीच निधी वाटप

02418
...

काम पूर्ण होण्याआधीच ९ लाखांचा निधी वाटप

साळवण वनक्षेत्रपाल कार्यालयातील प्रकार

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १२ : शासकीय काम पूर्ण केल्यानंतर त्या कामाचे पैसे मिळविण्यासाठी अनेक प्रोटोकॉल पूर्ण करावे लागतात. अनेक वेळा चकरा माराव्या लागतात. मात्र, कोल्हापूर उपवनसंरक्षक कार्यालयाच्या साळवण येथील वनअधिकारी परिक्षेत्र कार्यालयातील दुरुस्तीसाठीचे काम पूर्ण होण्याआधीच ९ लाख ४५ हजार ३१० रुपयांचा निधी वाटप केला आहे. अजूनही या कार्यालयाचे काम सुरू असताना ३१ मार्च २०२३ पूर्वी ते पूर्ण झाल्याची कागदपत्रे रंगवली आहेत. अशा निधी वाटपामुळे वनविभागातील इतर कामांमध्येही कोणत्या प्रकारे निधी वाटप झाला असावा, याचा अंदाज येऊ शकतो.
जिल्हा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत असणाऱ्या विविध परिक्षेत्र कार्यालयांची डागडुजी किंवा किरकोळ दुरुस्तीचे कामे करण्यासाठी मंजूर असलेल्या निधी पैकी ८ लाख ७८ हजार १९० एका चेकद्वारे तर इतर काही रक्कम दुसऱ्या चेकद्वारे वितरीत केली आहे. हे काम कदाचित ३१ मार्च पूर्वी पूर्ण करण्याची अट असावी. या कालावधीत संबंधित ठेकेदाराकडून हे काम पूर्ण झालेले नाही. याशिवाय, आजही या कार्यालयाच्या डागडुजीचे काम सुरू असून म्हणाव्या तेवढ्या गतीने होत नसल्याचे चित्र आहे. मात्र, मिळालेला निधी परत जावू नये, यासाठी अधिकाऱ्यांनी मखलाशी करत ३१ मार्चपूर्वी ते पूर्ण असल्याचे दाखवून या कामासाठी मंजूर असणारा ८ लाख ७८ हजार १९० रुपयांचा निधी गौरव पाटील या ठेकेदाराला चेकद्वारे (चेक नंबर ७३१२६१) वितरित केला आहे. याशिवाय जीएसटी, सुरक्षा निधी म्हणून असणारी सुमारे ६७ हजार रक्कम ही वेगवेगळे चेक देऊन वितरीरित केली आहे.
साळवणमधील या कार्यालयाचे काम पूर्ण नसतानाही काम पूर्ण झाले म्हणून शासकीय निधीचा चुकीच्या पद्धतीने वाटप करणाऱ्या अधिकाऱ्याच्या धाडसाला कोणाचे पाठबळ आहे, याचा शोध घ्यावा लागणार आहे. शासन वनविभागाला भरपूर निधी देते. या निधीचा विनियोग योग्यरित्या झाला पाहिजे किंवा त्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. जे काम अद्याप पूर्णच नाही त्या कामाचा निधी ३१ मार्च २०२३ रोजीच वितरित केल्याचे दिसून येत आहे.
.....

एका वाक्यात उत्तर

दरम्यान, ‘काम पूर्ण होण्याआधीच निधीचे वाटप झाले आहे का?’ असा प्रश्‍न वनक्षेत्रापाल अविनाश तायनाक यांना विचारला असता त्यांनी असे काही झालेले नाही, असे एका वाक्यात उत्तर दिले.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com