निवडणूक अधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक अधिकारी
निवडणूक अधिकारी

निवडणूक अधिकारी

sakal_logo
By

निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज
---
मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकांत देशपांडे ः लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : ‘मतदार यादी अद्ययावत करणे, मयत मतदार वगळणे, नवमतदारांचा यादीत समावेश करणे याशिवाय प्रत्येक मतदान केंद्र सुसज्ज करण्याची कामे सुरू केली आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सक्रिय आणि सज्ज आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या तर प्रशासन सज्ज असले पाहिजे’, अशा सूचना अप्पर मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकांत देशपांडे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व संगणक परिचालक यांची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे आदी प्रमुख या वेळी उपस्थित होते.
डॉ. देशपांडे म्हणाले, की निवडणूक प्रक्रियेत मतदार नोंदणी अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत सहभागी सर्व यंत्रणेने आतापासूनच आवश्यक ती तयारी केली पाहिजे. निवडणूक आयोगाची प्रतिमा निर्माण करण्यात निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. आगामी लोकसभा व विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्व पात्र तृतीयपंथी व्यक्तींची मतदार नोंदणी झाली पाहिजे. तृतीयपंथीयांच्या गुरूंचे सहकार्य घेऊन मतदार नोंदणी वाढविण्यासाठी नियोजन केले पाहिजे.
मतदार नोंदणी अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदार याद्या तपासण्याचे काम वेळेत पूर्ण केले पाहिजे. नवमतदारांचा मतदार यादीत समावेश झाला पाहिजे. मतदारांचे स्थलांतर झाले असल्यास असे मतदार वगळले पाहिजेत. याशिवाय, मृत, दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून तत्काळ कमी करावीत. मतदार यादीत मतदारांची नावे तपासून घेण्यासाठी विविध ठिकाणी शिबिरे घेतली पाहिजेत. मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी अर्ज भरून घ्यावेत.
...

* मतदान केंद्र सुसज्ज करा...
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी दिल्या पाहिजेत. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सर्व सुविधा द्यायला हव्यात. ज्या मतदान केंद्रांवर सुविधा नसतील, त्या ठिकाणी दुरुस्ती करून घेतली पाहिजे. मतदारांना मतदान ओळखपत्र मिळवून द्यावे, असेही देशपांडे यांनी सांगितले. मतदारयादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे, अस्पष्ट छायाचित्रे, मतदान ओळखपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी आदी विषयांचा आढावा घेऊन लोकसभा व विधानसभा मतदारसंघनिहाय अद्ययावत मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना देशपांडे यांनी दिल्या.
...


*निवडणूक साक्षरता मंडळ

‘नवमतदार व भविष्यातील मतदारांची निवडणूक साक्षरता वाढविण्यासाठी ‘निवडणूक साक्षरता मंडळ’ स्थापन केले पाहिजे. युवक व नवमतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नवमतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. यासाठी निवडणूक साक्षरता मंडळातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असेही आवाहन महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, नोडल अधिकारी व कॅम्पस अम्बॅसिडर यांना डॉ. देशपांडे यांनी केले.