शासनाच्या यशोगाथेत गडहिंग्लजचा बचत गट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासनाच्या यशोगाथेत गडहिंग्लजचा बचत गट
शासनाच्या यशोगाथेत गडहिंग्लजचा बचत गट

शासनाच्या यशोगाथेत गडहिंग्लजचा बचत गट

sakal_logo
By

gad126.jpg
02385
गडहिंग्लज : संत रोहिदास बचत गटातील महिलांचा कोल्हापूर चपला बनवण्याचा व्यवसाय आहे. दुकानात उपस्थित गटातील महिला.
------------------------------------------------------
शासनाच्या यशोगाथेत गडहिंग्लजचा बचत गट
संत रोहिदास महिला गट; कोल्हापुरी चपलांचे उत्पादन पोहचले राज्यात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : राज्य शासनाने सुरु केलेल्या महाराष्ट्राची यशोगाथामध्ये गडहिंग्लज नगरपरिषदेच्या संत रोहिदास महिला बचत गटाचा समावेश झाला. या यशोगाथावर नगरपरिषद संचलनालयाकडून माहितीपट बनविण्यात येणार आहे. या गटाच्या कोल्हापुरी चपलांचे उत्पादन आता राज्यात पोहचले आहे. या यशाबद्दल गटाचे कौतूक होत आहे.
राज्यातील २५९ महापालिका, नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातून दिनदयाळ अंत्योदय योजनेतंर्गत (नागरी उपजिविका अभियान) स्थापन केलेल्या ४५ बचत गटांची यशोगाथासाठी निवड झाली आहे. त्यात जिल्ह्यातून केवळ गडहिंग्लज पालिकेच्या संत रोहिदास महिला बचत गटाच्या यशोगाथेचा समावेश आहे. या गटात १५ महिलांचा समावेश आहे. २२ डिसेंबर २०१८ मध्ये या गटाची स्थापना झाली. तत्पूर्वी या महला त्यांचा कातडी कमविणे व चपला बनविण्याचा पारंपारिक व्यवसाय करीत होत्या. काही महिला शेतमजुरी करीत असत. यामुळे त्यांचे उत्पन्न फार कमी होते. गट स्थापन झाल्यानंतर त्यांना दहा हजार रुपयांचा फिरता निधी मिळाला. त्यातून गटातील महिलांनी अंतर्गत कर्जाची देवाणघेवाण सुरु केली. काही कालावधीनंतर गटाला बँकेकडून अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेने मार्गदर्शन केले. या गटाला बँकेने १ लाख २० हजाराचे कर्ज दिले. ते योग्य पद्धतीने परतफेड केल्याने त्यांना नंतर २ लाख तर काही कालावधीनंतर ८ लाखाचे कर्ज मिळाले आहे.
या कर्जातून महिलांनी आपल्या पारंपारिक व्यवसायात सुधारणा करण्यासह कलाकुसरीच्या कोल्हापुरी चपला बनवून उपजिविकेचे साधन निर्माण केले आहे. कुटूंबाला हातभारही लावत आहेत. योजनेच्या माध्यमातून खऱ्‍या अर्थाने या महिला आत्मनिर्भर झाल्या आहेत. शासनाने याची दखल घेवूनच या गटाचा यशोगाथेत समाविष्ट केला आहे. माहितीपटासाठी आज या गटाचे चित्रीकरणही केले. यशोगाथा प्रस्तावकामी मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्या मार्गदर्शनाने सहायक प्रकल्पाधिकारी जयवंत वरपे, संघटक संदीपकुमार कुपटे यांचे सहकार्य मिळाले.
--------
इतर महिलांना प्रेरणादायी
गडहिंग्लजच्या गल्लीतील एका बचत गटाची राज्याच्या यशोगाथेत समाविष्ट झाल्याने इतर सर्वसामान्य कुटूंबातील महिलांना याची प्रेरणा मिळणार आहे. पालिकेने या योजनेतंर्गत केलेल्या उल्लेखनिय कामाचाही महितीपटात समावेश होणार असल्याचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी सांगितले.