फुटबॉल

फुटबॉल

फोटो  २४७१ 
कोल्हापूर : शाहू छत्रपती गोल्ड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेमध्ये शुक्रवारी बालगोपाल तालीम संघाचा जिबोलो याने धेम्पो गोवा संघावर अशी जोरदार चढाई केली. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

बलाढ्य धेम्पोवर बालगोपाल भारी
२-१ असा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश; जिबोलो चमकला
सकाळ वृत्तसेवा  
कोल्हापूर ता. १२ : शाहू छत्रपती गोल्ड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेमध्ये आज बालगोपाल तालीम संघाने धेम्पो गोवा संघाचा २- १ अशा गोल फरकाने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बालगोपालच्या नियोजनबद्ध खेळात त्यांचा जिबोलोने दोन गोल करीत चमक दाखविली.
येथील राजर्षी शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या शाहू छत्रपती गोल्ड चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीस प्रारंभ झाला. पहिला सामना बालगोपाल विरुद्ध धेम्पो स्पोर्टस्‌ क्लब (गोवा) यांच्यामध्ये झाला. चार स्थानिक संघांना मुख्य फेरीत राज्याबाहेरील संघांशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे बालगोपालने पहिल्या मिनिटांपासूनच दबावाचे ओझे बाजूला ठेवून आक्रमक आणि सूत्रबद्ध खेळ केला. सामन्याच्या नवव्या मिनिटालाच बालगोपालचा राहुल पाटील यांच्या पासवर जिबोलो याने हेडद्वारे गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे बालगोपालच्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला. बालगोपालने संधी मिळाली, तर चढाई करायची; पण आघाडी कमी होऊ द्यायची नाही, असा काहीसा बचावात्मक पवित्रा घेतला. दरम्यान, धेम्पो संघाने शॉर्ट पासिंगचा अवलंब करत गोलचे दडपण न घेता शांतपणे खेळ केला. बालगोपालच्या डीमध्ये ४० व्या मिनिटाला उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत धेम्पोचा खेळाडू ब्रायन धारिया याने त्यांच्या पहिल्या गोलची नोंद केली. त्याने सामना १-१ अशा बरोबरीत आला. मध्यंतरापर्यंत हीच स्थिती होती.
उत्तरार्धामध्ये दोन्ही संघ जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरले. धेम्पोने तब्बल सहा खेळाडू बदलून चढाईचा प्रयत्न केला. बालगोपालच्या खेळाडूंनी लॉंग पासिंगचा अवलंब करत आक्रमक चढाया केल्या. दरम्यान, ६५ व्या मिनिटाला बालगोपालच्या जिबेलो याची गोल करण्याची संधी वाया गेली. त्यामुळे आघाडीच्या खेळाडूंनी व्यूहरचना बदलून चढाया केल्या. जिबोलो याने ७६ व्या मिनिटाला चेंडूवर ताबा मिळवला आणि धेम्पोच्या डीमध्ये मुसंडी मारली. आणि गोलरक्षकाला चकवा देत मैदानी गोल केला. संघाच्या आणि वैयक्तिक दुसऱ्या गोलची नोंद केली.
यानंतर मात्र बालगोपालने बचावात्मक खेळ करण्यास सुरुवात केली. धेम्पो गोवानेही गोलची परतफेड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र ८५ व्या मिनिटाला मिळालेल्या दोन कॉर्नर किकचा लाभ त्यांना उठवता आला नाही. निर्धारित वेळेत सामना बालगोपालने दोन विरुद्ध एक गोलने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
दरम्यान, सामन्याचे उद्‍घाटन आमदार ऋतुराज पाटील, राहुल पापल, मंगेश पाटील, आदित्य मेनन, रोहन शिर्के, तेज घाडगे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, यशराजे, यशस्वीनीराजे उपस्थित होते. सामना निरीक्षक म्हणून धनराज मोरे, तर पंच म्हणून मुंबईचे किशोर चौधरी, साकेत बावस्कर, योगेश हिरेमठ आणि अजिंक्य गुजर यांनी काम पाहिले. 

आजचा सामना
शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध मोहामेडन स्पोर्टस्‌ (कोलकत्ता) - सायंकाळी ४:३०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com