इचल : मुख्य अंकासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : मुख्य अंकासाठी
इचल : मुख्य अंकासाठी

इचल : मुख्य अंकासाठी

sakal_logo
By

जलवाहिनी बदलण्याचे काम लांबणीवर

कृष्णा योजनेच्या दोन्ही निविदा अपात्र ; इचलकरंजी मनपा काढणार फेरनिविदा

इचलकरंजी, ता. १३ ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नळपाणी योजनेच्या जलवाहिनीच्या गळतीतून सुटका होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. या योजनेची उर्वरित जलवाहिनी बदलण्याच्या कामाची फेरनिविदा काढण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. मात्र त्या तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याचे काम लांबणीवर पडणार आहे.
शहराला कृष्णा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेची जलवाहिनी कालबाह्य झाली आहे. १७ किलोमीटर इतकी लांब ही जलवाहिनी आहे. यातील १२ किलोमीटरची जलवाहिनी बदलण्यात आली आहे. उर्वरित ५.२ किलोमीटरची जलवाहिनी अद्याप बदलण्यात आली नाही. त्यासाठी २१ कोटी ११ लाखांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यानंतर कामाची निविदा महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आली होती. मुदतीत एकही निविदा प्राप्त झाली नाही. त्यामुळे निविदेला मुदतवाढ देण्यात आली. यामध्ये दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या दोन्ही निविदांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली. मात्र त्यामध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत. कागदपत्रे चुकीची व अपुरी असल्याचे समोर आले आहे. प्रकल्प सल्लागार कंपनीनेही याबाबत फेरनिविदा काढण्याच्या सूचना केल्या आहेत.
यामुळे पुन्हा कामाची फेरनिविदा काढावी लागणार आहे. यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी जाणार आहे. तोंडावर पावसाळा येत आहे. त्यामुळे फेरनिविदा मंजूर झाल्यानंतर काम सुरु करण्यात काही अंशी अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलवाहिनी बदलण्याचे काम रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. परिणामी, गळतीच्या संकटातून आणखी काही दिवस तरी सुटका होणार नाही.