राजाराम स्टेडीयमवर असुविधांचाच खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम स्टेडीयमवर असुविधांचाच खेळ
राजाराम स्टेडीयमवर असुविधांचाच खेळ

राजाराम स्टेडीयमवर असुविधांचाच खेळ

sakal_logo
By

ich126 to 10.jpg
02488
इचलकरंजी ः १) महापालिकेचे भव्य असे क्रिकेटचे राजाराम स्टेडियम.
02489
२) स्टेडियममधील प्रेक्षा गॅलरीच्या छताच्या पत्र्यांना अशी अवकळा आली आहे.
02490
३) मैदानातील गटारी उघड्या असून, त्या कचऱ्याने भरल्या आहेत, तर भिंतींनाही भगदाड पडले आहे.
02491
४) स्टेडियमध्ये असणाऱ्या ग्रीलच्या दरवाजाची मोडतोड करीत वहिवाट केली आहे.
02485
५) खेळाडूंनाच भाड्याने आणलेल्या रोलरद्वारे मैदानावर रोलिंग करावे लागते. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)
-----
लोगो ः ग्राऊंड रिपोर्ट
----------
राजाराम स्टेडियमवर असुविधांचाच खेळ
खेळाडूंमध्ये नाराजी; इचलकरंजी मनपाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी, ता. १४ : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि प्रशस्त गणले जाणारे महापालिकेचे राजाराम क्रिकेट स्टेडियम सध्या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. मैदानावरील प्राथमिक सोयी-सुविधांचा बोजवारा उडाला आहे. खेळाऐवजी ‘ओपन बार’साठी याचा अधिक वापर होत आहे. स्टेडियमची इमारत हळूहळू कोसळत असून, मैदानावरील लॉन, मातीचे अस्तित्व संपत चालले आहे. खेळाडू कमी अन् बाहेरच्यांचा जास्त वावर मैदानावर दिसतो. खेळाच्या विकासासाठी स्टेडियमचा विकास महत्त्वाचा असून, महापालिकेने त्याकडे आता अधिक सजगतेने लक्ष द्यायला हवे, अशी माफक अपेक्षा खेळाडू करीत आहेत.
तब्बल २० वर्षांचे इचलकरंजी क्रिकेट नावलौकिकाचा साक्षीदार असलेल्या राजाराम स्टेडियममध्ये रणजी सामने झाले आहेत. मैदानावर सध्या ग्रामीण व शहरी भागातील खेळाडू सरावासाठी येतात. अधिकाधिक चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळाडू तयार व्हावेत, यासाठी खेळाडूंना पायाभूत सुविधा गरजेच्या आहेत. मात्र, मैदानावर पायाभूत सुविधांची वानवा आहे. येथील स्वच्छतागृहाकडे दुर्लक्ष झाले आहे. गटारी उघड्या असून, त्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच कचऱ्याने भरून गेल्या आहेत. स्वच्छतेअभावी दुर्गंधी पसरली आहे. स्टेडियम इमारतीत खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. स्वच्छतागृहात प्लास्टिकचे ग्लास पडलेले दिसतात. मैदानात पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. अनेक बाजूने सुरक्षा जाळी व लोखंडी दरवाजाचे बार तोडून ये-जा करण्यासाठी नवा मार्ग तयार केला आहे. मैदानातील बांधकामाची पडझड झाली आहे. भिंतीला तडे गेले आहेत. भिंतीवरील सिमेंटचे पापुद्रे गळून पडले आहेत. बैठक व्यवस्थेलाही भगदाड पडले आहे. मैदानातील विद्युत व्यवस्थाही निकामी झाली आहे. रात्रीसह दिवसाही दारू पिणाऱ्यांसाठी हे मैदान म्हणजे हक्काचे ठिकाण बनले आहे. मैदानात पावलोपावली गैरसोयीच अनुभवयास मिळत आहे.
-----
पत्रे उडून थेट मैदानात
सर्वात मोठे स्टेडियम असल्याने येथे २० हजार जणांची बसण्याची व्यवस्था आहे. स्टेडियमची गॅलरी पत्र्याच्या शेडने बंदिस्त आहे, मात्र वारा आला की हे पत्रे उडून जात आहेत. सध्या काही ठिकाणी तुटलेले पत्रे आहेत, तर सर्रासपणे पत्रे उडून गेल्याचे चित्र आहे. वारा आला की पत्रे उडून थेट मैदानातच पडत आहेत. या घटना वारंवार घडत असल्याने जीव मुठीत घेऊन खेळाडू सराव करत आहेत. तसेच इमारतीचा काही भाग कोसळत आहे. महापालिकेकडून स्टेडियम इमारत दुरुस्ती, तसेच पत्रे बदलण्यासाठी नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजनेतून तीन कोटी रुपये मिळण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे, मात्र त्याची प्रतीक्षा एका वर्षांनंतर तशीच आहे.
----
ड्रेसिंग रूम बंद
स्टेडियमचे आकर्षण दूरवर असल्याने परजिल्ह्यातील खेळाडू येथे उत्साहाने सरावासाठी येतात, मात्र गैरसोयींनी त्यांचा उत्साह मावळत आहे. सरावासाठी आल्यानंतर साधी ड्रेसिंगरूमही उघडी नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे. ड्रेसिंगरूमच्या सुसज्जतेबाबतचाही प्रश्न आहे. आधीच मैदानातील टर्फ विकेट स्पिच नेटके नसतानाही जीव ओतून खेळाडू कसून सराव करतात. अशा स्थितीत ड्रेसिंगरूम बंद असल्याने गैरसोय खेळाडूंची होत आहे. याचा सर्वाधिक फटका बसल्याने महिला खेळाडू पाठ फिरवत आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहच नाही.
----
पार्किंग व्यवस्था नाहीच
२० हजार लोकांची बैठक व्यवस्था इतकी क्षमता आणि २५ हजार ४३६ स्क्वेअर मीटर इतक्या जागेत बांधलेल्या राजाराम स्टेडियममध्ये पार्किंग प्रश्न गंभीर आहे. स्टेडियममध्ये आल्यानंतर वाहन पार्किंग करताना दमछाक होते. स्वंतत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यावर, फूटपाथवर सर्रासपणे वाहनांची गर्दी वाढते. यातून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक असून, वाद तर नित्याचे दिसतात. पार्किंग नसल्याने मार्गावरील वन वे वाहतुकीवर ताण अधिक येतो. स्टेडियममध्ये समस्यांची गर्दी आणि बाहेर वाहनांची गर्दी, असे चित्र दररोजच पाहायला मिळते.
----
भाड्याने काय काय आणायचं
इचलकरंजी क्रिकेट असोसिएशनसह अन्य क्रिकेट असोसिएशनकडूनही क्रिकेट स्पर्धांचे आयोजन मैदानात केले जाते. यासाठी महापालिका एका दिवसामागे १२०० रुपये भाडे आकारते. यामध्ये दुपटीने वाढही केली आहे, मात्र त्या तुलनेत सुविधा मात्र अजिबात मिळत नाहीत. सराव करताना व स्पर्धा कालावधीत वॉटरिंग, रोलिंग, टर्फविकेटसाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागत आहेत. भाडे देऊनही भाड्याने काय काय आणायचं, असा सवाल खेळाडू, प्रशिक्षक, असोसिएशनस करीत आहेत.
-----
02486
रणजी ट्रॉफी झाल्यावर राजाराम स्टेडियमने वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यातून इचलकरंजीतील अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीयस्तरावर चमकले; मात्र सध्या योग्य निगा न राखल्यामुळे गैरसोयींचा डोंगर उभा राहिला आहे. खेळाडूंना वेळीच सुविधा दिल्या नाहीत, तर मैदान बघायला शिल्लक राहणार नाही इतके संकट गदड आहे.
-आनंदा दोपारे, ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू
----
02487
राजाराम स्टेडियममधील मैदान तयार करण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचे टेंडर काढले जाते, मात्र त्या पद्धतीने काम काहीच होत नाही. मैदानातील लॉन, माती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महापालिका खेळासाठी पैसे आकारणी करते, मात्र खेळासाठी पायाभूत उपाययोजना काहीच होत नाहीत. याठिकाणी नियमांची आणि सुविधांची नितांत गरज आहे.
-इकबाल कलावंत, अध्यक्ष, इचलकरंजी क्रिकेट असोसिएशन
--------