काँग्रेस जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस जल्लोष
काँग्रेस जल्लोष

काँग्रेस जल्लोष

sakal_logo
By

02616
...

साखर-पेढे वाटून काँग्रेसचा आनंदोत्सव

भाजपच्या हुकूमशाहीला लोक कंटाळलेः सतेज पाटील

कोल्हापूर, ता. १३ : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने छत्रपती शिवाजी पुतळा येथे साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणेसह काँग्रेस विजयाच्या घोषणा देवून परिसर दणाणून सोडला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत हलगी आणि घुमक्याच्या तालावर ठेका धरल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणीत झाला.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘कर्नाटकमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. चाळीस टक्के भ्रष्टाचाराचे सरकार म्हणून भाजप कार्यरत होते. कर्नाटकमधील सामान्य माणसांनी काँग्रेसच्या बाजूने निकाल दिला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडोची संकल्पना खऱ्या अर्थाने सार्थ ठरली आहे. कर्नाटकमधूनच आता भारत जोडोची सुरुवात झाली आहे. लोकांच्या मनात भाजपबद्दल रोष आहे, हे मताद्वारे दाखवून दिले आहे. दक्षिणमधील कर्नाटक हे एकच राज्य षडयंत्र करुन भाजपकडे फोडून घेतले होते. लोकसभेच्या १५० जागा दक्षिणमध्ये आहेत. कागवाड मतदारसंघात कागे यांची जबाबदारी होती. तेथील कार्यकर्त्यांनीही खूप कष्ट घेतले आहेत. याशिवाय, राहुल गांधी यांनी तेथील नागरिकांना २०० युनिट वीज माफ, दहा किलो तांदूळ, बेरोजगारांना स्टायपेंड, महिलांना मोफत प्रवास याची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे सांगितले आहे. देशात दोन-तीन राज्ये सोडली तर भाजपकडे स्वबळाचे काहीही नाही. कोणाचे तर सहकार्य घेवूनच केलेले आहे. महाराष्ट्रातही स्वत:चे काहीही नाही. आमदार फोडून त्यांनी सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्रातही याचा परिणाम होणार आहे. भाजपच्या हुकूमशाहीला लोक कंटाळले आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून येणार आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकोप्याने लढू. महाविकास आघाडीचे सरकारच लोक निवडून देतील.’ यावेळी आमदार जयश्री जाधव, सचिन चव्हाण, राजाराम गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
...

* राम नवमीला भाजप कुठे होते?

‘कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी भाजपने मोठ्या प्रमाणात रामनवमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परवा झालेल्या रामनवमीला हेच भाजप कुठे गायब होते? असा सवाल करत लोकांनाही भाजपची खेळी कळली आहे. सध्या महागाई, बेरोजगारीचे प्रश्‍न आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री प्रचारालाही फिरले नाहीत, अशीही टीका सतेज पाटील यांनी केली.